गोवा ते कोल्हापुर जाणार्‍या टेम्पोमधुन तब्बल १४ लाख ४० हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त

 

७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, २१ लाख ५० हजाराचा मुद्देमाल आज उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त

✍️प्रतिनिधी :- रविकांत जाधव

🎴कणकवली, ता.२४: गोवा ते कोल्हापुर जाणार्‍या टेम्पोमधुन तब्बल १४ लाख ४० हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू , तसेच ७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, २१ लाख ५० हजाराचा मुद्देमाल आज उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई – गोवा महामार्गावर गोवा ते कोल्हापूर जाणार्‍या टेम्पोतुन दारू वाहतुक होत असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नांदगाव येथे चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो पडकला. त्यात तपासणी केली असता रियल सेव्हन व्हिस्किच्या ३६०० सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १४ लाख ४० हजार रूपये आहे. या प्रकरणी टेम्पो चालक भरत संजय चव्हाण (वय २८, रा.अदमापुर, ता.भुदरगड, जि.कोल्हापुर) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच दारू साठ्यासह ७ लाख रूपये किंमतीचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला.

या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या जी.सी.जाधव, प्रभारी निरिक्षक, जी.एल राणे स.दु.नि., जवान एस.एस.चौधरी, जे.आर.चव्हाण, महिला जवान श्रीमती. एस.एस.कुवेसकर यांनी सहभाग घेतला.

याप्रकरणी भरत संजय चव्हाण (​२८) मुळ आदमापुर, भुदरगड सध्या राहणार बांदा ता. सावंतवाडी याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ​२६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!