अखेर प्रतिक्षा संपली; करुळ घाट आज सायंकाळपासून वाहतूकीस सुरुवात
खचलेल्या करूळ घाटाचे काम मंगळवारी पूर्ण झाले असून हा घाटमार्ग आज सायंकाळी 6 वा. वाजल्यापासून वाहतुकीला सुरू करण्यात आला असल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. करुळ घाट वाहतूकीस सुरु होत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अतीवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. 12 जुलै रोजी घाटातील मोरी नजीकचा अर्धा भाग खचल्याने हा घाट राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतूकीस बंद होता. जवळपास 13 ते 14 दिवस या ठिकाणी खचलेल्या भागाच्या बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान लोकप्रतिनिधी आमदार नितेश राणे हे या कामाकडे लक्ष ठेवून होते. त्यांनी दोन वेळा कामाची पाहणीही केली होती. गेली 14 दिवस करुळ घाट बंद होता. तसेच भुईबावडा घाटाला मोठ्या भेगा गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा घाट अनिश्चित काळासाठी बंद ठेवला आहे.
तालुक्यातून जाणारे हे प्रमुख घाट मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. फोंडाघाट मार्गे प्रवास करावा लागत होता.मंगळवारी करूळ घाट मार्ग वाहतुकीस सुरू झाला असल्याने वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.