येणारी नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार .. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत.
शिवसेनेकडून स्थानिक उमेदवारांना दिले जाणार प्राधान्य.
प्रतिनिधी – संजय शेळके
वैभववाडी:२७- वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीत गेली पाच वर्षे सत्ताधाऱ्यांनी वाया घालवली.नगरपंचायत हे सत्ताधाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन बनले आहे अशी टीका जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केली. तसेच १० डिसेंबर पर्यंत नगरपंचायतीच्या कारभाराचा पंचनामा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना कार्यालयात सतिश सावंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी आ.नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सडकून टिका केली.
सावंत म्हणाले, मागील निवडणुकीत आ.नितेश राणे यांनी विकासाचे व्हिजन दाखवून मते मागितली होती. राज्यात ही नगरपंचायत आदर्शवत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र राज्यात नव्हे तर साध्या जिल्ह्यात देखील या नगरपंचायतीचे काम आदर्शवत नाही. केवळ सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता मिळविणे हे सत्ताधा-यांचे समीकरण आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.येथील नगरसेवक ठेकेदारात गुंतले आहेत.त्यामुळे येथील विकास खुंटला आहे असा आरोप सावंत यांनी केला. येथील जनता सत्ताधा-यांच्या कारभाराला कंटाळले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
बावीशे लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरात कच-यावर ३८ लाख रुपये खर्च होत आहेत. याचे ठेकेदार पुण्यातील आहेत. ते कोणाचे मित्र आहेत ते आम्ही लवकरच जाहीर करू असा इशारा देखील दिला.
येणारी नगरपंचायतीत निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत.या निवडणुकीत शिवसेनेकडून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नितेश राणे यांनी राबविलेल्या प्रकल्पावर त्यांनी टिका केली.