मळगांव येथे गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी

 

उमेद कपिला उत्पादक गट, पिंपळवाडी, ब्राह्मणपाट अर्थात जय हनुमान स्वयंसहायता गट या महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानांतर्गतच्या महिला बचत गटाच्या महिलांची कार्यशाळा

 

 

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

रासायनिक खतांचा होत असलेला वापर व त्यामुळे होणारा अवास्तव खर्च तसेच सुपीक असणाऱ्या शेत जमिनीत होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम व फायदेशीर उपाय ठरु शकतो. ही बाब लक्षात घेऊन मळगांव ब्राह्मणपाट मधील पिंपळवाडी येथील महिला बचत गटाच्या महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे.उमेद कपिला उत्पादक गट, पिंपळवाडी, ब्राह्मणपाट अर्थात जय हनुमान स्वयंसहायता गट या महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानांतर्गतच्या महिला बचत गटाच्या महिलांनी हा प्रयोग मागील दोन वर्षांपासून यशस्वीपणे राबविला आहे. या सहित या महिलांनी जीवामृत हे फवारणी औषध बनविण्याचा व डी कंपोंझर हे फवारणी औषध तयार खरण्याचा प्रयोगही यशस्वी केला आहे.

कपिला उत्पादक महिला बचतगट या कार्यशील बचत गटात सुचिता रामचंद्र राऊळ, अपर्णा अमर राऊळ, मानसी महादेव केरकर, अर्चना अजित नाईक, दर्शना देविदास नाईक, प्रमोदिनी प्रकाश राऊळ, अनुष्का अजित सातार्डेकर ,समिक्षा गोपाळ राऊळ, रुपाली किरण राऊळ, मनोरमा मंगेश राऊळ,शुभांगी शामसुंदर राऊळ,कविता केशव परब, सुमित्रा सुधाकर केरकर,द्वारका नारायण गावकर, समिधा दिलीप राऊळ या पंधरा महिलांचा समावेश आहे. या महिलांनी यशस्वी केलेल्या या प्रकल्पाची पाहणी करण्याबरोबरच या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच शुक्रवारी मळगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर ,माजी सदस्य गजानन सातार्डेकर, पत्रकार तथा माळीचेघर मळगांव मधील ग्रामस्थ सुखदेव राऊळ , शेतकरी नारायण राऊळ, पांडुरंग हळदणकर आदीनी भेट दिली.

यावेळी या प्रकल्पाबाबत माहिती देताना गटाच्या स्वयंसहाय्यीका सुचिता राऊळ यांनी, “आमच्या गटाचे नाव जय हनुमान स्वयंसहायता गट असे असून या गटाला सलंग्न जोडून आम्ही कपिला उत्पादक महिला बचत गट हा गट तयार करुन गांडूळ खत तयार करत आहोत.तसेच आम्ही डि कंपोझरही तयार करत असून गांडूळ खत तयार करण्यासाठी आम्ही गिरिशीरीचा पाला, उसकीची पाला, शेण व डि कंपोझरचा वापर करतो. या खतासाठी आम्ही हा पाला यासाठी वापरतो की, हा पाला लवकर कुजतो व शेण खत लवकर तयार होते. या खतामुळे जमिनीत लवकर प्रक्रिया होऊन शेतीला फायदा होईल असा आमचा प्रयत्न आहे.तसेच आम्ही जे जीवामृत तयार केले आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळांची वाढ होते. आॅक्सीजनचे प्रमाण वाढते. तसेच आम्ही जे डि कंपोझर तयार करतो ते झाडावर मारल्यास झाडावरील हिरव्या पानांची संख्या वाढते. त्यांच्यामधील थंडावा कायमस्वरूपी टिकून राहतो. तर आम्ही जे गांडूळ खत गिरिशीरीचा पाला, शेण, उसकीची पाने वापरुन तयार करतो त्यामुळे गांडूळ खताची प्रक्रिया वाढते. तसेच आम्ही या खतात गुरांचे खाऊन उरलेले व खाल्यानंतर गुरांना पाया खाली तुडवलेले गवतही वापरतो. हे शेणखत तयार झाल्यावर त्यावर आम्ही डि कंपोझरचा व जीवामृत चा फवारा मारतो. यामुळे आमचे गांडूळ खत उत्तम रितीने तयार होते. आमच्या या खताला मोठी मागणी आहे. यापेक्षा अधिक मागणी आली तरी आम्ही ती पुरवू शकू. जर कोणाला हवे असल्यास त्यांची मागणी आम्ही पूर्ण करु. “अशी माहिती देताना विश्वास व्यक्त केला.

ब्राम्हण पाटच्या सीआरपीएफ रत्नप्रभा नाईक यांनी आपली प्रतिक्रिया देताना, ” ब्राम्हण वाटते 16 गट आहेत. या गटांपैकी जय हनुमान महिला बचत गट (समूह) स्थापन झाल्या पासून आम्ही धाडसी उपक्रम राबवून व्यवसाय प्रोत्साहन दिले. तसेच त्यांना गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण देताना उत्पादक गट स्थापन करण्यास प्रेरीत करुन त्यांनी स्थापन केलेल्या गटाला कपिला समूह असे नाव दिले. या गटाला 2 लाख रुपये अनुदान मिळवून दिले. या रक्कमतून या गटाने त्यातील 50 हजार रुपये खर्च करून बांधकाम केले व साहित्य खरेदी केले. उर्वरित 1 लाख 50 हजार रुपये त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च केले. या रक्कमेतून सामान घेतले व गांडूळ खत तयार करण्यास सुरुवात केली. कपिला समूहाच्या या खताला सद्या मोठी मागणी आहे. त्यांच्या या खताला अधिक मागणी यावी असा आमचा प्रयत्न असून मळगांव ग्रामपंचायतीने या समूहाला मदत करावी. जर आमच्या 16 समूहांपैकी 1 समूह जरी या समूहा कडे पाहून पुढे आला तरी बाकीचे 14 समूहही या समूहाकडे पाहून आपणही असे खत तयार करण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी या कपिला समूहाला आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असून मळगांव ग्रामपंचायत मार्फत ही आम्हांला मार्गदर्शन मिळत आहे. मळगांव ग्रामपंचायतीने आम्हांला यापुढे ही मदत करावी, अशी अपेक्षा ही रत्नप्रभा नाईक यांनी व्यक्त केली.

मळगांव ग्रामपंचायत मळगांवचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी, ” उमेद कपिला बचतगट या गटातील महिलांनी यशस्वी केलेला हा शेणखत प्रकल्प व डी कंपोंझर प्रकल्प सावंतवाडी तालुक्यातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याचे मत व्यक्त करताना हा प्रकल्प मळगांव ग्रामपंचायती अंतर्गत होत आहे ही अभिमानाची बाब आहे. या स्वयंसहायता गटाला व गटातील महिलांना मळगांव ग्रामपंचायत मार्फत जास्तीत जास्त सहकार्य देऊन या प्रकल्पातील खताची विक्री वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून यश मिळवून असे आश्वासन दिले. तसेच हनुमंत पेडणेकर यांनी या महिलांचे कौतुक करताना हा प्रकल्प उत्तरोत्तर यशस्वी होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

हा गट 19 नोव्हेंबर 2019 ला स्थापन झाला होता व आॅगस्ट 2020 पासून कार्यरत आहे.गेली अडीच वर्षे हा गट व गटातील सर्व महिला आपला संसार संभाळून हा प्रकल्प राबवित आहेत.या गटातील प्रयोगशील महिलांनी तयार केलेल्या या यशस्वी गांडूळ प्रकल्पासाठी जागा दिलेल्या पिंपळवाडी येथील शेतकरी शामसुंदर रामचंद्र राऊळ यांच्या या जागेत दोन बाय सात फुट आकाराच्या व अडीच फूट खोल अशा सात सिमेंटच्या टाक्या बांधून त्यामध्ये हा गांडूळ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात गिरीपुष्प अर्थात ग्रामीण भाषेत जितेरु, उसकीची पाने तसेच शेण व गुरांना खाऊन उरलेले व त्यांच्या पाया खाली तुडवून उरणारे उष्टे गवत असे मिश्रण बनवून या टाक्यां मध्ये कुजवून हे खत तयार केले जाते.

तसेच या प्रकल्पातील जीवामृत हे औषध तयार करण्यासाठी या महिला शेण, गुळ, गोमुत्र व पाण्याचा वापर करुन मिश्रण तयार करतात. हे मिश्रण तयार झाल्यावर त्याचा आठ दिवसात आॅरगेनिक फवारणीसाठी वापर होणे गरजेचे असते अशी माहिती या महिलांनी दिली आहे. तर डी कंपोझिशन हे औषध तयार करण्यासाठी या महिला काळा गुळ, डिकंपोझर व पाणी याचे मिश्रण करतात. हे मिश्रण केल्यानंतर हे फवारणी औषध आठ दिवसात फवारणी युक्त तयार होते. या औषधाचा वापर 3 वर्षापर्यंत करणे योग्य आहे, अशी माहिती या महिलांनी दिली.

कपिला बचत गटाच्या या महिलांमार्फत तयार करण्यात येणारे हे खत उत्तम प्रतीचे असल्याबाबतची माहिती देताना या बचत गटाच्या सुचिता रामचंद्र राऊळ व अपर्णा अमर राऊळ यांनी या खतामुळे शेत जमीन व पिकाची कोणत्याही प्रकारची हानी होत नसल्याची व या खताचा वापर आम्ही गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात करुन पाहिला आहे.आम्हांला व त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.आमच्या या खताला मळगांव सहित पंचक्रोशीतील व सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खुप मागणी आहे,अशी माहिती दिली.

या बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या या गांडूळ खत निर्मिती साठी 200 लीटर पाणी, 4 लीटर डी कंपोंझर, 1 किलो काळा गुळ असे मिश्रण तयार करुन ते सतत 8 दिवस ढवळून त्या नंतर आठ दिवसानंतर वापरण्यासाठी घ्यावा अशी माहिती देताना गटातील सुचित्रा नाईक यांनी यामुळे शेतातील व झाडांवरील कीड मरते. तसेच जमिनीतील ओलावा टिकून राहतो अशी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!