गोवा बनावटीची दारू विकून करोडपती झालेले रोडपती निश्चितच होणार..
▪️अवैध मार्गाने मिळालेला पैसा फार काळ टिकणार नाही..
▪️अवैध धंद्याविरोधात मनसे मोर्चा काढणार..
▪️दारूबंदी उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे पंचही गब्बर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.२०: ‘संसाराचा सर्वनाश करी दारू, बाटलीला स्पर्श नका करू’ या आशयाचा संपादकीय लेख प्रसिद्ध होताच दोन नंबर यंत्रणा खडबडून जागी झाली. या धंद्यावर अनेक लोकांची कुटुंबे अवलंबून आहेत, हे तुम्ही कशाला लिहिता, त्या मंडळींचे हात वर पर्यंत पोहचलेले आहेत. कुठच्याच बाबतीत ते लोक मागे नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भानगडीत पडू नका. अशा प्रकारचे दूरध्वनी अनेक हितचिंतकांनी केलेत, तर सहाशे छत्तीस वाचकांनी संदेश पाठवून आम्ही तूमच्या सोबत असल्याचे सांगितले, यात शासकीय अधिकारी, महसूल अधिकारी, यांचाही समावेश आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. कारण अशा बलाढ्य शक्ती विरोधात लढताना आपण मला बळ देण्याचा प्रयत्न केला.
ज्या माझ्या हितचिंतकांनी मला फोन करून तुम्ही या भानगडीत कशाला पडता? त्यांचे हात वर पर्यंत पोहचले आहेत. असे सांगून एक प्रकारे घाबरविण्याचे काम केले. या घटनेचा पडद्यामागचा सूत्रधार कोण हे आम्हाला चांगलेच माहिती असल्याने ज्याचे हात वर पर्यंत पोहोचले आहेत, त्याच्या मनगटाला हात घालून तो हात मुळापासून उखडून टाकायची हिंमत आम्ही उराशी बाळगतो, म्हणूनच अशा भानगडीत पडतो. अशा शब्दात मला फोन करणार्या समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागली.
मुळात पत्रादेवी गोवा येथून दारु आणून ती सिंधुदुर्गात विकणे हा आजचा खेळ नाही, तर गेली कित्येक वर्षे हे राजरोसपणे सुरु आहे. यामध्ये दारूबंदी उत्पादन शुल्क खाते पोलीस खाते, यांचे हात बरबटले आहेत. हे निश्चित, नाही तर एवढे मोठे धाडस हे दोन नंबर वाले करुच शकले नसते. दिवसाकाठी कोट्यावधी रुपयांची गोवा बनावटी दारू सिंधुदुर्गात आणली जाते, ह्या मागचे म्होरके वेगवेगळे असले तरी सगळ्यांचा बाप हा एकच आहे. आणि या दोन नंबर मधून मिळालेल्या पैशाचा त्यांना एवढा माज आहे की, रस्त्यावर कोणाशीही हुज्जत घालून त्याला कानफटावयला ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत, कारण हा फक्त पैशाचा माज आणि हाताशी असलेली तरुण मंडळी.
इतिहासात शिकवले गेले की, वृक्षाच्या मुळाशी घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात. एक-एक फांदी तोडायची गरज नाही. त्यामुळे दोन नंबर धंद्याच्या मूळाशी कोण आहे, त्याचा शोध घेऊन त्याची पाळेमुळे उखडून काढणे क्रमप्राप्त ठरणार आहे. चोरट्या दारु वाहतुकीसाठी दारूबंदी उत्पादन शुल्क खाते कार्यरत आहे. मात्र, हे खाते अमाप पैसे खाऊन गब्बर झाले आहे. त्यांच्याकडे असणारे पंच अधिकारी असल्यासारखेच वागतात. एखाद्या नवीन धंद्यावर धाड टाकली की, हे पंच नंतर त्यांना जाऊन भेटतात व त्यांचा धंदा हप्ता ठरवून सुरळीत करतात. हे कधी कधी त्या अधिकाऱ्यांनाही माहिती नसते, त्यामुळे दारूबंदी उत्पादन शुल्काचे पंचही या अधिकाऱ्यांबरोबर गब्बर झाले आहेत.
पंच हे खाजगी असतात, त्यांचा दारुबंदी खात्याशी कोणताही संबंध नसतो. दारू पकडल्यानंतर मिळालेल्या मालाचा त्रयस्थ व्यक्ती समोर मोज माप करुन घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल याचा लेखाजोखा त्या त्रयस्थ व्यक्ती समोर मांडून त्याची सही घेतली जाते. त्याला पंचनामा म्हणतात व त्यावर सही करणारा पंच असे पंच पोलिस खात्यात पण असतात. पण दारूबंदी खात्याचे अधिकारी ज्या ठिकाणी कारवाई करायची आहे, त्या ठिकाणी बरोबर पंच घेऊन जातात व हेच पंच मिळालेल्या मालाच्या पंचनाम्यावर सही करतात व न्यायालयात हेच पंच फितूर होतात व आरोपी सुटतो व फितुरीचा मिळालेला पैसा वेगळा. त्यामुळे दारूबंदी खात्यातील अधिकाऱ्यांचे हे पंचच पहिल्यांदा बंद करायला हवेत.
कोणत्या ठिकाणी रेड टाकायला जायचे आहे, हे पंचांना माहिती असते व तोच पंच त्या विक्रेत्यांना तुझ्यावर रेड टाकायला येत आहेत, असे अगोदरच कळवतो व दारूबंदी खात्याच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने हात हलवत परत यावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. व दारुबंदी उत्पादन शुल्काच्या पंचामुळेच गावोगावी छोटे-मोठे दारू धंदेवाले उदयास आले आहेत.
कोरोना लाॅकडाऊन मध्ये एक नंबर धंदा कुठचा चालला असेल तर तो दारू धंदा. गावोगावी नवीन युवक दारू विक्री करणारे निर्माण झालेत. आपल्या स्कूटर वरून आडवाटेने पत्रादेवी येथे जाऊन गोवा बनावटी दारू आणून ते आपल्या भागात विकू लागलेत. आता तर त्याही पेक्षा भारी शक्कल लढवली जात आहे. ज्या ठिकाणी पार्टी आहे, त्या ठिकाणी हे दारू पिणारे त्यांना लागणारा सर्व दारु सामान खाद्यपदार्थ जागेवरून फोन करतात. फक्त एक फोन लावला की झाले. त्यामुळे खेडोपाडी दारू विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
एखादा दारू विक्रेता पंचांच्या पोलिसांच्या नजरेला पडला की, त्याचा हप्ता ठरवून त्याला अधिकृत केले जाते. मग तो राजरोसपणे दारू विकायला मोकळा. असे कितीतरी धंदेवाले या लाॅकडाऊन च्या काळात शहरात गावात निर्माण झाले आहेत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. याचेच दुःख होते. युवा पिढी या धंद्यामध्ये ओढली जात आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आपले आयुष्य बरबाद करत आहेत. तर दारु ओढणारा मालक मात्र, गब्बर होऊन अमाप पैसा मिळवत आहे.
सिंधुदुर्गातील दारुबंदी खात्याचे अधिकारी बक्कळ पैसा मिळून करोडपती झाले आहेत. याबाबत आम्ही वारंवार उठाव केला. मात्र, सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प बसले. आता मात्र, मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अमली पदार्थ, दारू, मटका, यांच्याविरुद्ध मनसे मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करायचे असेल तर अशी आंदोलने व्हायलाच हवी ते काम माजी आमदार परशुराम उपरकर करत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू कारण त्या दोन नंबर धंदेवाल्यांची मक्तेदारी कोणीतरी मोडीत काढायला पुढे यायलाच हवे. आम्ही सुरुवात केली आहे. आमच्या लढ्याला सर्वांनी सहकार्य करावे अशी आमची रास्त मागणी आहे. मात्र, कोण पुढे येणार नाही. याचीही खात्री आहे, तरीही आम्ही हा लढा लढत राहू कारण आमची तत्वाची, सत्याची, लढाई आहे. त्यापासून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, व परिणामाची तमा आम्ही बाळगत नाही. जे होईल त्याला सामोरे जाण्याची जिद्द, हिंमत, आम्ही आमच्या उराशी बाळगतो. त्यामुळे कोणीही कितीही चुडत्यांचे साप करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.
पत्रादेवीच्या डुप्लीकेट दारूवर श्रीमंत झालेले करोडपती रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या पाटेकरच्या भूमीत खोटे, चुकीचे, काम कधीच जास्त काळ तग धरू शकत नाही. ते कधी ना कधी मातीमोल होणार याची आम्हाला खात्री आहे. कारण या शहरात अनेक करोडपती आम्ही पाहिले व शेवटी ते रोडपती झालेले ही पाहिले हा इतिहास कोणी पुसून टाकू शकणार नाही. या ठिकाणी जो लीनतेने राहिला, तो मोठा झाला. आणि जो उन्मत्त झाला, तो संपला हा इतिहास आहे. त्यामुळे बक्कळ पैसा मिळवण्याच्या नादात युवा पिढी बरबाद करणाऱ्यांना श्री देव पाटेकर, उपरलकर कधीच माफ करणार नाही. कारण अवैध मार्गाने मिळालेला पैसा कधी सुख, समाधान, शांती देऊ शकत नाही. एवढे ध्यानात ठेवा. पुनश्च माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करतो की, त्यांनी याबाबत उठाव करण्याचा शब्द दिला व ते पूर्ण करतील याची खात्री आहे.
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_