‘संसाराचा सर्वनाश करी दारू, बाटलीला स्पर्श नका करू’ मात्र; ‘लाखो रुपये हप्ता देऊन अधिकाऱ्यांचे पोट भरू’..
▪️गोव्यातून सिंधुदुर्गात होतेय करोडो रुपयांची चोरटी दारू वाहतूक..
▪️सावंतवाडी शहर बनले दोन नंबर धंदेवाल्यांचे माहेरघर..
▪️बियर, दारूच्या बाटल्यांचे लेबल बदलून दारु पुढे पाठविण्याचे कामही केले जाते सावंतवाडीत..
▪️गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मात्र सुशेगाद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.१९: ‘संसाराचा सर्वनाश करी दारू’ ‘बाटलीला स्पर्श नका करू’ अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दूरदर्शन वर जाहिरात दाखवली जाते. मात्र, या जाहिरातीचा शेवटचा भाग ‘बाटलीला स्पर्श नका करू’ ‘अधिकाऱ्यांचे मात्र हप्ते देऊन पोट भरू’ हे द्यायला शासन सोयीस्कररित्या विसरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विशेषकरून सावंतवाडीच्या सीमेलगत गोवा हद्द असल्याने गोव्यातील पत्रादेवी येथील दारू सावंतवाडीत आणून जिल्ह्याभरात व जिल्ह्याच्या बाहेर पुरवठा केला जातो. दिवसाकाठी वीस ते पंचवीस ट्रिपा या दारू वाल्यांच्या गाड्या मारत असतात. चेक पोस्ट वरील पोलीस त्यांना सॅलूट मारुन पुढे सोडत असतात. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात युवा पिढी बरबाद होत आहे. अधिकारी मात्र हप्ते खाऊन गब्बर झाले आहेत. तर पुरवठा करणारे महिन्यागणिक आपल्या गाड्या बदलून अलिशान बंगले, डंपर, मिनी बस गाड्या घेऊन करोडपती झाले आहेत. तर दारू पिणाऱ्यांचे संसार उध्वस्त होऊन बायका-मुले रडत आहेत.
अलीकडेच या धंद्यामध्ये अल्पवयीन कॉलेज युवकांना सामील करून घेतले जात आहे. या युवकांना एका ट्रिप साठी एक हजार, दोन हजार रुपये दिले जातात व युवा पिढी मौज-मजा-मस्ती यासाठी या कडे आकर्षिली जात आहे. कुटुंब प्रमुखांचे आपल्या मुलांकडे लक्ष राहिले नाही. किंवा अशी चट लागलेली मुले त्यांना जुमानतही नसतील, नाहीतर सतरा वर्षाचा मुलगा पन्नास वर्षाच्या महिले सोबत शय्यासोबत करायला जाईल का? म्हणजे झटपट मिळालेल्या पैशामुळे चटाटवलेली ही वृत्ती एखाद्या रानटी प्राण्यापेक्षा भयानवह आहे.
गोव्यातील दारू सावंतवाडीत आणून तिच्यावरची लेबले बदलून दारू मिक्स करून वेगवेगळ्या प्रकारची दारू बनवण्याचे कारखानेही सावंतवाडीत सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. आम्हाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सावंतवाडीत काही ठिकाणी बिअर च्या बाटलीची लेबल बदलून ती बियर चढ्या दराने विकण्याचे काम केले जात आहे. बियर तीच मात्र लेबल वेगवेगळे असा प्रकार सुरू आहे. आणि हे सर्व दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने होत असल्याची चर्चा आहे.
मात्र महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता घेणारे अधिकारी दोन नंबर वाल्यांच्या गाड्यांमधून फिरून आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. अशा अविर्भावात सिंधुदुर्गात वावरत आहेत. या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची सेवा या दोन नंबर धंदे वाल्यांकडून पुरविली जात असल्याने तेही त्यांच्या अनैतीक कृत्यात सामील आहेत. सात वर्षापूर्वी असा अधिकाऱ्याचा अनैतीक प्रकार एका बार चालकाच्या पत्नीने उघड केला होता. व त्याला अटकही झाली होती. एकंदरीत गोवा सीमेवर असलेला सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी दोन नंबर धंद्याचे माहेरघर बनली आहे. हा दोन नंबर धंदा करणारे सावंतवाडीत दहा ते पंधरा जण आहेत. तर चिरीमिरी धंदा करणारे ५० ते ६० जण या सर्वांचा मिळून लाखो रुपये हप्ता त्या लाचखोर अधिकाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी दाखवायला रेड करायची व ती पण रेड ठरवून करायची, सांगून करायची, हा सर्व प्लॅन तयार असतो. प्रत्येक दारू डीलरवर वर्षाला पाच दहा दारुचे किरकोळ गुन्हे दाखल होणार हे हप्ता ठरवतानाच सांगितले जाते. कारण त्या केसेस शासनाला दाखविण्यासाठीच केल्या जातात. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे ‘आळी मिळी गुपचिळी आणि अधिकाऱ्यांची बसली दातखिळी’ असा झाला आहे.
हा प्रकार रोखण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे येणार नाही. कारण प्रत्येक पक्षाचे लागेबांधे या दोन नंबर धंद्यामध्ये आहेत व त्यामुळेच कोणताही राजकीय पक्ष अशा धंद्याच्या विरोधात उठाव करणार नाही आणि जर उठाव केला, तरी तडजोड झाली की, उठाव थंड झाला. असे प्रकार घडत आहेत. आणि काही-काही दोन नंबर धंदेवाले तर राजकीय पक्षांच्या आश्रयाखालील आहेत. त्यामुळे त्यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यांच्या विरोधात लिहिणार्यांनाही धमकावणे पर्यंत त्यांची मजल जाते. मात्र, ज्यावेळी डोक्यावरून पाणी जाते, त्यावेळी उठावा करावाच लागतो. क्रांतीची सुरुवात कोणीतरी करावी लागते. एक उभा राहिल्यानंतर हजारो हात जमा होतात. एकट्याने तरी उभे राहायला पाहिजे. या एकाच हेतूने हा लेखन प्रपंच करावा लागत आहे. आता तरी अधिकारी जागे होतील. कुठेतरी या प्रकाराला आळा घालतील म्हणून हा लेखन प्रपंच करावा लागत आहे. गेंड्याच्या कातडीचे अधिकारी खाऊन-खाऊन मस्तावलेले अधिकारी यांना कोणताही फरक पडणार नाही. याची जाण आम्हाला आहे. मात्र, या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना कुठे, कधी, कसा, लगाम घातला पाहिजे याचे तंत्र हे आम्हाला अवगत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता तरी झोपेचे सोंग आणू नये, जागे व्हावे व गोव्यातून सिंधुदुर्गात होणारी लाखो रुपयांची चोरटी दारू वाहतूक पूर्णपणे बंद करा व जो पर्यंत असे होत नाही, तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांविरोधात असे लेखन करतच राहू! मग तो अधिकारी कितीही गेंड्याच्या कातडीचा असू दे. शेवटी आमच्या लिखाणाच्या दुधारी अस्त्राने त्याची कातडी फाटल्या शिवाय राहणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

