प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माडखोल धरणात युवकाचा नाहक बळी;
सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर यांनी व्यक्त केली खंत…
सावंतवाडी,दि.१२:- माडखोल धरणात अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह मिळाल्यानंतर माडखोल गावातील वातावरण बरेच तापले आहे. अतिउत्साही पर्यटक आणि धरणाकडे होणारा संबंधित विभागाचा दुर्लक्ष यामुळे ही घटना घडल्याची खंत माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर त्यानी व्यक्त केली आहे. 26 जुलै 2021 रोजी माडखोल ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन युवकांचे प्राण वाचवले होते. मात्र 10 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान अर्जुन पाताडे नामक युवक पाण्यात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अखेर काळाने डाव साधला. तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह माडखोल धरणात सापडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माडखोल धरण हे पर्यटन दृष्ट्या अविकसित राहिले आणि ते आज मृत्यूचे ठिकाण प्रसिद्धीस येऊ लागले आहे याला जबाबदार कोण?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाणी वापर संस्था माडखोल की ग्रामपंचायत माडखोल ,लघु पाटबंधारे कार्यालय की जिल्हाधिकारी कार्यालय ,सत्ताधारी सरकार की ३ टर्म चे आमदार, विद्यमान खासदार की पालकमंत्री ?असा खोचक प्रश्न आडेलकर यांनी उपस्थित केला आहे. आतातरी निद्रस्त झालेल्या शासनाने जागे व्हावे मिनी आंबोली धबधबा म्हणून नावारूपास येणाऱ्या माडखोल धरणावर योग्य ती उपाययोजना करावी तसेच सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने आपला पोलीस खाकीचा धाक दाखवून अतिउत्साही पर्यटकांना आवर घालावा अशी मागणी आडेलकर यांनी केली आहे.

