ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष २ वर्षात सत्तेसाठी विसर्जन केला त्या नितेश राणेंनी शिवसेनेवर बोलू नये-अतुल रावराणे
कणकवली,दि.१२:- अवघ्या वर्षांपुर्वी काढलेल्या स्वाभिमान पक्षाचं २०१९ साली विसर्जन करण्यात आलं आणि नंतर सत्तेसाठी वडिलांनी दिल्लीतील लोकांचे पाय धरले. आर्थिक तडजोडीनंतर राज्यसभा खिशात घातली. अशा सत्तेसाठी स्वतःचा पक्ष विसर्जित करून दुसऱ्याच्या सेवेत जाणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये. शिवसेनेवर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी हे लक्षात ठेवावं अशा शब्दांत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आमदार नितेश राणेंवर टिका केली. जे नितेश राणे उदय सामंत यांना दिवसातून दोन दोनदा फोन करतात आणि पालकमंत्र्यांचे भाऊ किरण सामंत यांच्याशी तुमची माणसे वरच्यावर भेटत असतात. मग टीका करून जनतेची दिशाभूल कशासाठी करताय ? असा सवालही उपस्थित केला.
मुंबईपासून खंडणीचे रेकॉर्ड बघितले तर आमदार नितेश राणेंचे आहे. परमवीर सिंगांवर खंडणीचे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर लूकआऊट नोटीस निघालेली आहे. नितेश राणेंनी स्वतःचा परमवीर सिंग होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असा घणाघाती पलटवार शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केला.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव-सावंत, नगरसेवक सुशांत नाईक,राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, भास्कर राणे, रिमेश चव्हाण, सुनील पारकर, रामदास विखाळे, पं.स.सदस्य मंगेश सावंत, महेंद्र डिचोलकर उपस्थित होते.

