कोरोना संकटातही आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली मात्र स्थानिक आमदार दिपक केसरकर गायब
एवढी मोठी आपत्ती जनतेवर ओढवली मात्र स्थानिक आमदार दिपक केसरकर गायब
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टिका
सावंतवाडी दि.२४ जुलै( प्रतिनिधी )
कोकणात डोंगर खचण्याच्या घटनांच्या वाढत्या प्रकारांमुळे सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी सालईवाडा ते झिरंग वाडीपर्यंत असणाऱ्या इमारती आणि घरांच्या बाबतीत खबरदारी म्हणून डोंगरांचे सर्वेक्षण व्हावे अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. दरम्यान कोरोना काळात आमदार दीपक केसरकर दिसले नव्हते ते या पूरस्थिती मध्ये सुद्धा दिसले नाहीत असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले, डोंगर खचण्याचे प्रकार वाढत आहेत. सावंतवाडी शहराला देखील नरेंद्र डोंगर लाभला असून या नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी सालईवाडा ते झिरंगवाडी पर्यंत घरे, इमारती आहेत. त्यांची देखील काळजी घेण्याची गरज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या डोंगराचे सर्वेक्षण करावे. भूजल यंत्रणेमार्फत खात्री करून घ्यावी आणि खबरदारीचे उपाय योजावेत.जनतेच्या हिताच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे.
सावंतवाडी तालुक्यात आलेल्या ठिकठिकाणच्या महापुराच्या आपत्तीने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, हे कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली बांदा, माडखोल धवडकी येथील पूरस्थिती मध्ये नुकसान झालेल्या जनतेपर्यंत पोहचले. भाजपाच्या वतीने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र आमदार केसरकर पोहचले नाहीत. जनता त्यांच्यावर प्रेम करते आणि हे जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत, असे दोन घटनातून उघड झाले आहे, कोरोनाच्या लाटेत आणि आता पूरस्थितीच्या काळात आमदार केसरकर लोकांना दिसले नाहीत अशी खंत नगराध्यक्ष परब यांनी व्यक्त केली.
दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, आपण या मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवली होती.मतदार संघातील ५८ हजार लोकांनी आपल्याला मतदान केले त्यांचे ते प्रेम मी विसरणार नाही त्या प्रेमापोटीच आपण नुकसानी झालेल्या व्यापारी, शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. भाजप आणि स्वतः च्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून ताडपत्री, जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट वाटप केले आहे. भाजपच्या माध्यमातून देखील मदत करण्याचा आपला प्रयत्न राहील.

