महाराष्ट्रात ज्यांनी सेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचाच शेवट झालेला आहे,त्यामुळे कोणी सेनेच्या अस्ताची काळजी करू नये ; प्रकाश कुवळेकर शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख यांचे प्रतिपादन..
_*🛑 महाराष्ट्रात ज्यांनी सेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचाच शेवट झालेला आहे,त्यामुळे कोणी सेनेच्या अस्ताची काळजी करू नये ; प्रकाश कुवळेकर शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख यांचे प्रतिपादन..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
*🎴राजापूर दि-०५ :-* काल भाजप मध्ये झालेल्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला की महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला त्यांचाच शेवट झालेला आहे. त्यामुळे कोणीही सेनेच्या अस्ताची काळजी करू नये. काल ज्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला ते कधीही शिवसेनेचे नव्हतेच असा खुलासा तालुकाप्रमुख यांनी केला आहे.
पक्ष प्रवेशाचा केवळ भपका केला गेला असून प्रत्यक्षात किती शिवसैनिकांनी प्रवेश केला हे आम्हाला चांगलेच ज्ञात आहे असेही कुवळेकर यांनी यावेळी सांगितले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या राजा काजवे यांची शिवसेनेतून यापूर्वीच हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाचा संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही असही तालुकाप्रमुख म्हणाले. तारळ मिठगवाणे येथील कोणत्याही शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी शिवसेना सोडलेली नाही. ज्यांनी भाजपात प्रवेश केला ते सर्व रिफायनरी समर्थक आहेत. अन्य पक्षातील असून सुद्धा शिवसेनेचे नाव घेऊन त्यांनी पक्षप्रवेश केला असा आरोपही तालुकाप्रमुख कुवळेकर यांनी केला आहे.
ज्यांनी शिवसेनेचे नाव घेऊन भाजपा पक्ष प्रवेश केला त्यांनी शिवसेनेच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. ज्यामध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करू नये असाही टोला कुवळेकर यांनी लगावला आहे.
राजा काजवे ज्या सागवे विभागामध्ये काम करीत होते त्या विभागात आमदार राजन साळवी यांच्याकडून अनेक विकासकामे झालेली असतानाही त्याचा विसर भाजपा प्रवेश केल्यानंतर काजवे यांना कसा काय पडला असा सवालही कुवळेकर यांनी उपस्थित केला.
ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली असे अनेक जण संपले मात्र शिवसेना संपलेली नाही. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करू नये असा इशाराही तालुकाप्रमुख कुवळेकर यांनी दिला आहे. नाणार येथील रिफायनरीचा विषय संपलेला असून कंपनीनेही आता नाणार मधून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे कोणीही नाणारची स्वप्ने पाहू नयेत असा सल्लाही कुवळेकर यांनी दिला आहे.