मळेवाड ‘पीएचसी’साठी स्वतंत्र रुग्णवाहीका द्यावी.
– राजन मुळीक यांची मागणी . आमदार, पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी
बांदा : प्रतिनिधी:शैलेश गवस
कोरोना काळात रुग्णांना गोवा बांबुळी तसेच अन्यत्र अधिक उपचारासाठी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययाव स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मळेवाड जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी केली आहे.
मळेवाड आरोग्य केंद्रात कोरोना काळात अनेक रुग्ण गोवा, कोल्हापूर व अन्य ठिकाणी अधिक उपचारासाठी खासगी गाड्यांमधून नेण्यात आले. रुग्णवाहिका नसल्यामुळे काही वेळा रुग्णांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे राजन मुळीक म्हणाले. त्यामुऴे पालकमंत्री उदय सामंत यांचेही याकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगत सदर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांनीही याकडे लक्ष देऊन सदर रुग्णवाहिका लवकरात लवकर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून द्यावी व रुग्णांची होणारी परवड थांबवावी, असे आवाहनही श्री.मुळीक यांनी केले.