गोवा सरकारचा जाहीर निषेध:साईप्रसाद काणेकर
*◾सिंधुदुर्गातील नोकरदारांना आज गोव्यात प्रवेश देण्यात न आल्याने गोवा शासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध ; शिवसेना बांदा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३ :-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांना आज गोव्यात प्रवेश देण्यात न आल्याने गोवा शासनाच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना बांदा शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी दिली आहे. नोकरदार वर्गाच्या पूर्ण पाठीशी शिवसेना राहणार असून नोकरदार तरुण बेरोजगार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी गोवा शासनाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा राज्यात आज सकाळी दररोज ये-जा करणाऱ्या तरुणांकडे पत्रादेवी सीमा तपासणी नाक्यावर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. प्रमाणपत्र नसल्यास या तरुणांना गोव्यात प्रवेश न देता सिमेवरून माघारी पाठविण्यात आले. यामुळे तरुणांनी नाराजी व्यक्त केली.
काणेकर म्हणाले की, गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ऋणानुबंध आहेत. दररोज गोव्यात हजारो तरुण-तरुणी रोजगारासाठी ये-जा करतात. या नोकरीवर त्यांच्या कुटुंबियांचे चरितार्थ चालते. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पहिले दोन दिवस या तरुणांना विनाअट प्रवेश देण्यात आला. त्यासाठी शासकीय आदेश देखील काढण्यात आला. मात्र आजपासून अचानक या तरुणांना प्रवेश नाकारून गोवा शासन या तरुणांच्या भावनांशी खेळत आहे.
गोवा शासनाने प्रवेश न दिल्यास या तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. नोकरी गमावून हे तरुण बेरोजगार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही गोवा शासनाची राहील. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या तरुणांच्या पूर्ण पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्री काणेकर यांनी सांगितले.