कारीवडे गावावर हुकूमशाही चालू देणार नाही-मंगेश तळवणेकर

 

*”आम्ही कायदा पाळणारी माणसे* – *कोरोना नियंत्रणात आल्यावर गांधीमार्गाने उत्तर देऊ* ”

*कारीवडे कचरा प्रकल्प तूर्तास स्थगित करावा.पर्यटन स्थळ, गार्डन,अन्य रोजगार उभारा आम्ही पाठिंबा देऊ*

*कारीवडे कचरा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध*

*आहे तोच कचरा प्रकल्प सुधारा*

सावंतवाडी नगरपरिषदेने हुकुमशाही गाजवत एखाद्या ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला नसताना तसेच आरोग्य विभागाचा दाखला नसताना संचार बंदी कलम 144 आणि लॉक डाउन यामुळे ग्रामस्थांना आंदोलनात्मक काहीही करता येणार नाही,याचा गैरफायदा घेऊन कारिवडे गावामध्ये अगदी ‘पन्नास फुटांवर शेकडो वर्षांची घरे’,शेती असताना कचरा प्रकल्प सुरू केला आहे ही एक प्रकारची दादागिरी आहे’हा प्रकल्प तूर्तास स्थगित करावा’ असा इशारा माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष श्री मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेला दिला आहे.
तळवणेकरानी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.मी १९९७ साली कारिवडे गावचा सरपंच असल्यापासून माझ्या तीन टर्म सरपंच पदाच्या कालावधीत व माझ्या नंतरच्या सरपंचांनी व ग्रामस्थांनी आतापर्यंत सदर प्रकल्पाला तीव्र विरोध केलेला आहे व अजूनही करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी सदर जागेत कंपाऊंड वॉल मंजूर झाली होती. माननीय राजन तेली हे आम्हाला घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तुमची कैफियत सांगूया म्हणून गेले होते.त्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला सांगितले होते की “तुम्ही आंदोलन वगैरे करू नका जागा नगरपालिकेचे आहे,त्यांना कंपाउंड वॉल बांधण्यास अडथळा करू नका, त्यात प्रकल्प चालू करायला किंवा इमारत बांधकाम करायला ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय मुळीच देणार नाही”तरीसुद्धा त्या जागी प्रकल्प चालू केला गेला आहे.पण नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी *हीच ती वेळ* या शब्दांची पुनरावृत्ती करून दाखवली.आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत या कालावधीत काहीही तक्रार करणार नाही.मात्र लॉकडाऊन संपल्यावर आंदोलन करू व हा प्रकल्प बंद करण्यास भाग पाडू. आताचे जिल्हाधिकारी माननीय के मंजूलक्ष्मी यांना माझी गावच्या व आजूबाजूच्या गावाच्या वतीने विनंती राहील की त्यांनी ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय सुरु असलेला प्रकल्प विनापरवाना ठरवून तात्काळ बंद करावा.व त्या ठिकाणी उद्यान,गार्डन,पर्यटन स्थळ असा कोणताही प्रकल्प सुरू करावा’अशी आमची माननीय जिल्हाधिकारी यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण ‘शेजारी-शेजारी राहणारे आपल्या अंगणात शेजाऱ्याचा कचरा देखील टाकू देत नाही’तर हे आता सुक्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ची मोठी गर्जना करणारी ही मंडळी या जागेत मैला टाकणार आहेत.त्यांनी जागेत चाळीस-चाळीस फूट खड्डे मारले आहेत ते कशासाठी?
सावंतवाडी बेळगाव हायवेला लागून असलेल्या कचरा प्रकल्पाची सध्याची अवस्था काय आहे?सुंदरवाडीत येऊ पाहणाऱ्या पर्यटकांचे स्वागत अशा दुर्गंधीने होत आहे. येथून येजा करणाऱ्या प्रवाशांना इथे आल्यावर श्वास रोखून धरावा लागतो.स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यावर चार दिवस तेथील जागा स्वच्छ करण्याची नाटक केली जातात ज्यात नगराध्यक्षांपासून मुख्याधिकारी असे सर्वच भाग घेत असतात. एक माजी नगराध्यक्ष तर तिथे क्रिकेट खेळण्याची स्वप्ने रंगवत होते. आता क्रिकेट खेळणे सोडाच तिथे येऊन दोन मिनिटे उभे राहून दाखवावे. लाखो रुपये खर्च करून नवीन स्ट्रॅटेजीज बनवून नवीन प्रकल्प उभारणी करण्यापेक्षा साधे उपाय करून, आहे त्याच प्रकल्पाला सुधरावे सुरक्षित करावे.
कारीवडे येथे होऊ घातलेल्या भव्य प्रकल्पाला लागूनच माननीय प्रवीण भाई भोसले यांनी मंत्री असताना धरण मंजूर केले होते व त्यावेळी त्या जागेचा जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार होता.कालवा कुठून जाणार?व शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार?या वादातून शेतकरी कोर्टात गेले होते त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री माननीय नारायण राणे साहेब यांच्याशी संपर्क साधून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन श्री नारायण राणे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्या बैठकीत मी स्वतः तत्कालीन सरपंच म्हणून उपस्थित होतो.”हा माझ्या जिल्ह्यातील लघु धरण प्रकल्प आहे,त्यामुळे तेरेखोल नदी सुद्धा जिवंत राहणार आहे. त्यापूर्वी तेरेखोल नदी कोरडी पडत होती.मला काही नकारात्मक ऐकण्याची सवय नाही जनतेला हे लघु धोरण व्हायलाच पाहिजे तुम्ही सर्व माहिती घेऊन आठ दिवसात सकारात्मक मंजुरीबाबत प्रस्ताव घेऊन या निधीचा मी बघतो”असे नारायणराव राणे साहेब स्वतः म्हणाले.ते धरणही पूर्णही केले.राणेसाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या नगराध्यक्षाना या विचारांचा विसर पडला असावा.
सदर प्रकल्पाला लागूनच हे लघु धरण आहे. त्यामुळे प्रकल्पाची घाण व मैला मिसळून पाणी दूषित होणार आहे. व शेतकरी, पशुपक्षांसह सर्वानाच हे त्रासदायक होईल.
‘एवढी वर्ष आम्ही संघर्ष करून हे धरण मंजूर करून घेतले. आमच्या नागरिकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही.स्वतःची राणेसाहेबांनी मंजूर करून कारीवडे पासून शेर्ले पर्यंत नळयोजनेला संजीवनी देऊन सर्व गावांना सुजलाम सुफलाम केले, त्या गावात आता नगराध्यक्षांनी व मुख्याधिकारी सावंतवाडी शहरातील घाण आणि मैला टाकणार आहेत.
‘गंगे समान पवित्र असणाऱ्या आमच्या मुळगाव तळवणे व सावंतवाडी संस्थान राजघराण्याचे गुरू व संपूर्ण त्रैलोक्यात ज्यांची ख्याती आहे असे महंत परशुराम भारती महाराज यांनी तेरेखोल नदी त केळीची पानं टाकून उलट्या दिशेने समुद्राची भरती घेऊन ओटवणे येथे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या समाधी पर्यंत येत असताना वाटेत तोफ झाली त्या ठिकाणी महाराज थांबले व तीथपर्यंत पाण्याची भरती येत आहे,असा आध्यात्मिक वारसा देखील या जागेला लाभला आहे.नगरपालिकेने लोकांच्या भावनांशी खेळू नये.
गेला काही काळ आमच्या तसेच आजूबाजूच्या गावातुन भाजी घेऊन येणाऱ्या बायका-पुरुषांवर अन्याय होत आहे.त्यांना एक टोपली भाजी विक्रीसाठी जागाही देत नाहीत.व त्यांच्या पोटावर लाथ मारणारी नगरपालिका यांना कारीवडे गावात एक टोपली कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प देखील करू देणार नाही.
मुख्याधिकारी हे तर आपले कर्तव्य विसरून कसेही वागतात, शहरात पाणी नाही,सुविधा नाही,ड्रेनेज मुळे विहिरी नादुरुस्त झाल्या आहेत.याकडे लक्ष देण्याचे सोडून ‘पानपट्टी स्टॉल, छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देत आहेत”रोजगार काढून घेणारे होण्या ऐवजी रोजगार देणारे व्हा”
सावंतवाडी नगर परिषदेच्या या कचरा प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे सदरचा प्रकल्प तात्काळ रद्द न झाल्यास नंतर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
एका भाजपच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीकडून एका भाजपकडे असलेल्या नगरपालिकेला ‘प्रकल्प रद्द करा’ असे सांगूनही जर नगरपालिका थांबत नसेल ,तर संघर्षाचा वारसा असलेल्या कारीवडे गाववासीयांना येत्या काळात तीव्र आंदोलन केल्या शिवाय पर्याय उरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!