दूषित पाणीपुरवठा बंद करा; अन्यथा आंदोलन छेडू!
दूषित पाणीपुरवठा बंद करा; अन्यथा आंदोलन छेडू!
कलमठ सरपंच, ग्रा. पं. प्रशासनाला धीरज मेस्त्री यांचा इशारा
कणकवली ः कलमठ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेद्वारे गेले काही दिवस बाजारपेठत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही अद्यापही उपाययोजना करण्यात आलेली नाही. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने बाजारपेठमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, दूषित होणारा पाण्याचा पुरवठा त्वरित थांबून स्वच्छ व मुलबल पाणी पुरवठा करावा, तसे न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत प्रशासनाला शिवसेना उबाठा पक्षाचे कलमठ युवा शहरप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य धीरज मेस्त्री यांनी दिला आहे. याबाबत निवेदन त्यांनी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कलमठ ग्रा. पं. नळपाणी योजनेद्वारे बाजारपेठेत गेले काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. आशिये येथील लोकवस्तीतून सांडपाणी गडनदी पात्रात सोडले जाते आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी दूषित झाले आहे. या पाण्यावर कलमठ ग्रा.पं.तीची नळयोजना कार्यान्वित आहे. गेले काही दिवस नळयोजनेद्वारे बाजरपेठ परिसरातीत दूषित पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्यापही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. सांडपाण्यामुळे गडनदीतील पाणी दूषित झाले असून या नळयोजनाद्वारे होणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करावा. तसेच बाजारपेठेला दुसऱ्या ठिकाणाहून स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मेस्त्री यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, हेलन कांबळे आदी उपस्थित होते.

