कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

पुंडलिक कदम यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पुंडलिक कदम यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनसेवेच्या कार्याची पावती; वेर्ले गावातील झुंजार नेतृत्वाचा सन्मान

सावंतवाडी : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाशी गेली अनेक वर्षे निष्ठेने जोडून राहून संघटनात्मक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वेर्ले गावातील झुंजार नेतृत्व श्री. पुंडलिक कदम यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चा, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पुंडलिक कदम यांनी भाजपच्या माध्यमातून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाची विचारधारा आणि संघटनेची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गोरगरीब, गरजू आणि सर्वसामान्य जनतेची अडलेली कामे संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. पदाचा उपयोग केवळ राजकारणासाठी न करता समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरले आहेत.
वेर्ले गावापासून सुरू झालेली त्यांची संघटनात्मक वाटचाल आता जिल्हास्तरावरील जबाबदारीपर्यंत पोहोचली असून, भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या निवडीमुळे वेर्ले गावासह परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची तळमळ या बळावर पुंडलिक कदम आगामी काळात संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!