Uncategorized

दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा
खड्डे, वाढलेली झाडी, वाहून गेलेल्या साईडपट्ट्या आणि गटारांचा अभाव; दत्ताराम गावकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
दोडामार्ग, दि. ८ : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून खड्डे, दुतर्फा वाढलेली झाडी, वाहून गेलेल्या साईडपट्ट्या आणि गटारांचा अभाव यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम विष्णू गावकर यांनी ७ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोडामार्ग यांच्याकडे निवेदन सादर केले.
तालुक्यातील बांदा-दोडामार्ग, आयणी-पर्यत-पडवे, माजगाव-तेपुली-तिठा-मंदार हॉल, तळकट-फुकेरी तसेच झरे बांबर-मांगेली या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून अनेक ठिकाणी गटारे नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या वाहून गेल्या असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असून अपघाताचा धोका वाढला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
नुकत्याच झालेल्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, काही रस्त्यांची नुकतीच कामे करण्यात आली असतानाही अल्पावधीतच त्यांची दुरवस्था झाल्याने संबंधित कामांच्या दर्जाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे. निकृष्ट कामास जबाबदार असलेल्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
खड्डे बुजवा, झाडी हटवा; गटारांची व्यवस्था करा
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, दुतर्फा वाढलेली झाडी हटविणे, गटारे साफ करणे, आवश्यक ठिकाणी नवीन गटारे बांधणे आणि वाहून गेलेल्या साईडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती करणे, या मागण्या मनसेने केल्या आहेत.
“रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आणली जाईल,” असा इशारा दत्ताराम गावकर यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र सैनिक मुकुंद परब, अक्षय कुबल, रत्नदीप गवस, नवलू झोरे, अनुराग रेडकर, अर्जुन धुरी, नितीन देसाई, नाना देसाई, संदेश सावंत आणि शंकर गावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!