नगराध्यक्षांनी ठोकले पालिकेच्या दवाखान्याला टाळे.
सावंतवाडी:२३- गेले कित्येक दिवस सावंतवाडी पालिकेतीच्या दवाखान्यातील डॉक्टर वेळेत दवाखान्यात येत नसल्याची बाब लक्षात आल्यावर आज येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिकेच्या दवाखान्याला सकाळी अचानक भेट दिली.यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर वेळेत उपस्थित नसल्याच्या रागातून त्यांनी थेट दवाखान्याला टाळे ठोकले.दरम्यान जोपर्यंत संबंधित वैद्यकीय अधिकारी येवून योग्य तो खुलासा करत नाहीत,तोपर्यंत आपण दवाखाना उघडणार नाही,असा इशारा श्री.परब यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी स्वतः ही माहीती दिली.
ते म्हणाले,पालिकेच्या दवाखान्यात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी वेळेत नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे खुद्द परब यांनी आज साडेनऊ वाजता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे श्री.परब यांनी नाराजी व्यक्त केली. व थेट दवाखान्याला टाळे ठोकले.गेले काही दिवस हा प्रकार सुरू आहे. आता तरी या डॉक्टरांना जाग येईल का..? असा प्रश्न दवाखान्यात उपस्थित असलेल्या रुग्णांना पडला आहे.

