झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगांव येथे नॅचरल गॅस साठी केलेले खोदकाम पावसाळ्यापूर्वी बुजवा
खोदलेले चर व त्यामध्ये टाकलेली माती वाहने, जनावरे, गुराखी व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी जीवघेणी ठरण्याची सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ शेतकरी यांच्याकडून भीती व्यक्त
सावंतवाडी ( सुखदेव राऊळ)
नव्या योजनेखाली जुने व पक्के रस्ते खोदून होत्याचे नव्हते करणे ही जणू सार्वजनिक बांधकाम विभागाचा विकासाच्या नावाखाली दरवर्षी पावसाळ्यापूर्वीचा कार्यक्रम बनला आहे. जिथे जावे तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे हेच विदारक चित्र पहायला मिळत आहे.विकास राहतो दूर. मात्र विकास होण्यापूर्वी जनतेला मात्र प्रचंड किंमत मोजावी लागते. सावंतवाडी तालुक्यातील मळगांव पंचक्रोशीत सध्या हेच चित्र आहे. महाराष्ट्र नॅच्युरल गॅस प्रा.लि.या कंपनीने गॅस पाईप लाईन साठी मळगांव परिसरात जे रस्ते खोदून फक्त माती ओढली आहे, ती येत्या पावसाळ्यात केवळ त्रासदायकच नव्हे तर जीवघेणी ठरणार आहे.केवळ मळगांववासीयच नव्हे तर हे काम ज्या झाराप पत्रादेवी महामार्गावर करण्यात आले आहे त्या द्रुतगती महामार्ग असलेल्या महामार्गावरून मुंबई-गोव्याच्या दिशेने ये-जा करणऱ्या वाहतूकीला प्रचंड त्रासदायक व धोकादायक ठरणार असल्याचे कटू सत्य बनले आहे.
मळगांव ग्रामपंचायतीने दखल घेताना या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेऊन योग्य दखल घेतली आहे. या बैठकीत गॅस पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकाम व खोदकाम करुन पाडलेल्या चरा संदर्भात चर्चा करण्याबरोबरच या कामामुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोका याबाबत नॅशनल हायवे अधिकारी महेश खाटे यांच्या सोबत मळगांव ग्रामपंचायत सरपंच सौ. स्नेहल जामदार,
उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, निकिता बुगडे,निकिता राऊळ, अनुजा राऊळ, माजी सदस्य गुरुनाथ गावकर, गजानन सातार्डेकर, भाऊ देवळी, पंचायत समिती सावंतवाडी माजी सभापती राजू परब, ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांदेकर, ग्रामस्थ उदय जामदार, विश्वनाथ गोसावी, निलेश राऊळ, तुळशीदास नाईक आदी उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत घरोघरी नैसर्गिक गॅस या योजनेअंतर्गत मळगांव येथील खरोबा जंक्शन ते रेडकरवाडी पर्यंत मागील दोन महिन्याच्या कालावधीत झाराप -पत्रादेवी महामार्गावर महामार्गाच्या एका बाजूला समांतर खोदकाम करुन जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे, त्या पाईपलाईन साठी खोदण्यात आलेला चर व पाईपलाईन टाकून चर बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली माती आगामी पावसाळ्यात धोकादायक ठरणार असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच यामुळे पावसाळ्यात या चरात जनावरे व जनावरे नांगरणी साठी ने-आण करणारे गुराखी व शाळकरी विद्यार्थी, पादचारी महिला, वृद्ध, लहान मुले रुतून जीवितहानी होण्याबरोबरच या महामार्गावर ये-जा करणारी वाहने रुतून नुकसान होण्याची शक्यता दर्शविण्यात आली.
दरम्यान या बैठकीत चर्चेअंती ठरविण्यात आले आहे की, येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत खोदलेल्या चरात पाणी टाकून ही माती घट्टपणे बसवून त्यावर रस्त्याच्या लेव्हल पर्यंत खडी टाकून रोलर फिरवावा व त्यानंतर त्यावर डांबर टाकून रस्ता पुर्वव्रत करण्यात यावा.तसेच रस्त्याच्या बाजूला शिल्लक राहिलेली माती काढून दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात यावी. जेणेकरून चिखल होणार नाही.
मळगांव ग्रामपंचायत मार्फत नॅचरल गॅस पाईपलाईन मुळे संभाव्य असलेल्या या संकटाबाबत घेण्यात आलेली ही संकट पूर्व खबरदारी व त्यासाठी गॅस पाईपलाईन प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना करावी याबाबत देण्यात आलेल्या सूचना व सूचनांनुसार कार्यवाही व्हावी अशी बाळगलेली अपेक्षा कितपत पूर्ण होते व पाईपलाईन मुळे तसेच या पाईपलाईन साठी खोदण्यात आलेला चर केव्हा भरला जातो याची प्रत्येक शेतकऱ्यांना प्रतिक्षा असेन याबाबत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.