अनेक संकटाचा सामना करता करता रवी जाधवने ठेवला समाजासमोर एक वेगळा आदर्श
ज्या मुलावर जन्मतः गरिबीचे संकट पुढील शैक्षणिक संकट, त्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी उभे राहिलेले संकट, स्वयंम रोजगार निर्माण करून इतरांना रोजगार देण्याचे मनसुबे आखत असतानाच सावंतवाडी नगरपालिकेने त्याला बेरोजगार करून निर्माण केलेले संकट, त्यावरही मात करत गावोगावी जाऊन भाजी विकणारा एम ए,एम कॉम एम फील,झालेला सुशिक्षित बेरोजगार रवी जाधव यांनी आपल्या उभ्या आयुष्यात आलेली संकटे पाहून भाजी विकून मिळालेल्या नफ्यातून थोडी रक्कम बाजूला ठेवून आज दुसऱ्यांदा चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलू एक नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.
रवी जाधव हा जिमखाना परिसरात राहणारा सुशिक्षित बेरोजगार युवक, एम ए ,एम कॉम, एम फिल, पर्यंत शिक्षण घेऊनही नोकरीची संधी मिळाली नाही तरीही हताश न होता त्याने प्रत्येक उत्सवाला लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकण्याचा नवा धंदा सुरू केला,या धंद्यात त्याची प्रगती होत असतानाच सावंतवाडी नगरपालिकेने तो वापरत असलेली मोक्याची जागा हिसकावून घेतली, त्यावर उपोषणे झाली, मंत्र्यांचे आश्वासन मिळाले, पण काही उपयोग झाला नाही ,तरीही निराश न होता या जिद्दी युवकाने या सर्वांवर मात करून भाड्याच्या गाडीतून भाजीपाला नेऊन कोरोना काळातही गावोगावी फिरून भाजी विकून त्याने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला आहे.
भाजीपाला विकून जो नफा मिळतो त्यातील काही रक्कम अनाथ मुलांसाठी बाजूला ठेवली होती त्या रक्कमेतून कोरोना काळात दोन वेळा रवी जाधव या युवकाने मदत केली आहे, आजही चिपळूण येथील पूरग्रस्तांना ५०किलो कांदे व ७० किलो बटाटे पाठवून दिले आहेत, अशा या जिद्दी युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे,संकटाला कवटाळून न बसता त्याला धैर्याने सामोरे जाणाऱ्या या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

