बांदा-डिंगणे रस्त्यावर कारला अपघात
बांदा-डिंगणे रस्त्यावर बांबरवाडी येथे भरधाव वेगात मोटार रस्त्याच्या कडेला उलटून अपघातग्रस्त झाली. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी अपघातांची संख्या वाढत असल्याने या रस्त्यावरील बेकायदा वाहतूक बंद करावी अशी लेखी मागणी डिंगणे ग्रामपंचायतीने सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
गोवा-महाराष्ट्र सीमेवर कोरोना निगेटिव्ह अहवाल मागत असल्याने गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करणारे अनेक वाहनचालक डिंगणे मार्गे बांदा या रस्त्याचा वापर करत आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू असते. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बेकायदा वाहतुकीवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र सुसाट वेगात वाहतूक सुरूच असल्याने या रस्त्यावर अपघात होत असल्याचे डिंगणे उपसरपंच जयेश सावंत यांनी सांगितले.
आज या रस्त्यावर मोटार रस्त्याच्या कडेला पलटून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.