गोवा बनावटी दारु वाहतूक करणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
बांदा, दि २५:
गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची दोन स्विफ्ट मोटारींमधून बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई करत दारुसह एकूण १४ लाख ८१ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डिंगणे-गाळेल रस्त्यावर गाळेल तिठा येथे आज करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाची गेल्या दोन दिवसातील बेकायदा दारू वाहतुकीविरोधातील ही दुसरी कारवाई आहे. याप्रकरणी गणेश गजानन काळसेकर (वय २२, रा. निरवडे, ता. सावंतवाडी) व रविराज अंबाजी सावंत (वय २७, रा. तांबोळी खालची वाडी, ता. सावंतवाडी) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर विभागीय आयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई भरारी पथकाचे उपनिरीक्षक जितेंद्र पवार यांनी केली. स्विफ्ट मोटारीतून बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार डिंगणे-गाळेल रस्त्यावर उपनिरीक्षक पवार यांनी आपले सहकारी उपनिरीक्षक कुमार कोळी, सुहास वरुटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, प्रदीप गुरव यांच्यासह सापळा रचला होता. गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या दोन स्विफ्ट मोटारीला (एमएच ४३ एक्स ९६९७) व (एमएच ०४ डीडब्ल्यू १९३५) तपासणीसाठी थांबविण्यात आले. दोन्ही मोटारींची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्की, कमांडर थ्री एक्स रम, बुलडॉग केशिव फेणी, मॅक्डोल नंबर १ व्हिस्की या विविध ब्रँडच्या दारूचे १२० खोके जप्त करण्यात आले.

