गोव्यातील नोकरदारांसाठी सकारात्मक निर्णयाची गोवा मुख्यमंत्र्यांची ग्वाही
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
बांदा :प्रतिनिधी:शैलेश गवस
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार परराज्यातून गोव्यात येणार्यांसाठी कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. नोकरीनिमित्त दररोज ये जा करणार्यांसाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही फोनवरून चर्चा केली आहे. न्यायालयात सुनावणीवेळी सदर मुद्दा प्रकर्षांने घेऊन यावर निश्चितपणे तोडगा काढण्याचे आश्वासन गोवा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यानच्या काळात कोणाचीही नोकरी जाणार नाही असे गोवा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे स्पष्ट केले.
गोवा राज्यात परराज्यातून प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवार पासून सिंधुदुर्गातून गोव्यात नोकरीनिमित्त जाणार्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा चेकपोस्टवर रिपोर्ट सादर न करणार्यांना प्रवेश रोखण्यात आला. स्थानिक युवकांनी बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे याप्रश्नी लक्ष वेधले.
बांदा ग्रामपंचायत कार्यालयात भाजपतर्फे पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी जि. प. महिला बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर, सरपंच अक्रम खान, जि. प. सदस्य सौ. श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती सौ. निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ, भाजपा राज्य सदस्य मंदार कल्याणकर, तालुकाध्यक्ष महेश धुरी, तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, शहरध्यक्ष राजा सावंत, माजी ग्रा. पं. सदस्य हुसेन मकानदार आदी उपस्थित होते.
यावेळी तेली म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून सुमारे १४ हजार युवक युवती रोजगारासाठी गोव्यात ये जा करतात. हायकोर्टाच्या निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. गोवा मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत हायकोर्टात सीमाभागातील नोकरीनिमित्त येणार्यांना सूट देण्याबाबतचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत कोणाचीही नोकरी जाणार नाही असे आश्वासन गोवा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्पष्ट केले.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. व्हेंटिलेटर, अॉक्सिजन, बेडची सुविधा अपुरी आहे. अॉक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी शेकडो रुग्णांचे जीव गेले याला जबाबदार कोण ? पालकमंत्री, आमदार यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. सावंतवाडी आमदार केवळ पत्रकार परिषद घेऊन मुंबईत लपून बसतात.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेहमीच सिंधुदुर्ग जिल्ह्याला सहकार्याची भूमिका घेतली आहे. दररोज ये जा करणार्यांसाठी निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल. कोणाचीही नोकरी जाणार नाही हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवावा असे आवाहन राजन तेली यांनी केले.

