जर मुख्यमंत्री पिंजऱ्यात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसले???
.उदय सामंत : मुख्यमंत्र्यांवरील आरोप पंतप्रधानांनाही लागू
कणकवली, दि. १७ : नारायण राणे आणि काही विरोधक मंडळी मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसल्याची टीका करताहेत. पण जर मुख्यमंत्री पिंजऱ्यात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसलेत याचेही उत्तर विरोधकांनी द्यावं असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज लगावला. तसंच जे आरोप मुख्यमंत्र्यांवर होतात तेच आरोप
पंतप्रधानांनाही लागू पडतात हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं असेही ते म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथील तहसील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक श्री. मुल्ला, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काम करतात ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बघतेय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही. उलट काम करण्याला प्राधान्य देतोय. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधील परिस्थिती पहावी. तेथील अनेक भागात स्मशानात मृतदेह ठेवण्यासाठी जागा राहिलेली नाही. एकाचवेळी अनेक चिता पेटलेल्या दिसताहेत. त्याबाबतचे व्हीडीओ देखील व्हायरल होताहेत तेही पहायला हवेत.