सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील युवा धर्मप्रेमींसाठी गुढीपाडवा निमित्त ऑनलाइन शौर्य जागृती व्याख्यान संपन्न
चैत्र शुद्ध प्रतिपदा हे केवळ हिंदूंचे नव्हे, तर सर्व जगाचे नववर्ष ! – श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
सिंधुदुर्ग,१६- विश्वाचा उद्गाता वेद आहे. वेदा मध्येच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे करावे असा उल्लेख आहे आणि ते जगाने मान्य केले आहे. त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा हे फक्त हिंदूंचे नाही तर अख्या जगाचे नवीन वर्ष आहे.
या दिवशी वसंत ऋतूला आरंभ होतो. हा ऋतू सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ असे देवताही सांगतात. यावेळी हवामान समशीतोष्ण असून झाडांना नवीन पालवी फुटते हे आहे नैसर्गिक महत्त्व. याच दिवशी प्रभू श्रीरामांनी वालीचा वध केला, शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला त्यापासून शालिवाहन शक सुरू झाले.
याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली, सृष्टीची निर्मीती ब्रह्मदेवाने केली. साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे त्यामुळे अध्यात्मिक दृष्ट्याही हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिन आणि गुढीपाडवा यांचा संबंध जोडून समाजामध्ये होत चाललेला अपप्रचार रोखणे, गुढीपाडव्याचे महत्त्व हिंदु बांधवांपर्यंत पोहोेचवणे आणि हिंदु धर्मानुसार आचरण करण्यासाठी उद्युक्त करणे या उद्देशाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाइन शौर्य जागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचा २०० हून अधिक धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
धर्मासाठी झुंजावे, झुंझोनी अवघ्यांसी मारावे ! मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले !! हा उपदेश समर्थ रामदास स्वामींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ४५० वर्षांपूर्वी केला होता आणि आजच्या दिवशी संभाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. मृत्यूशी झुंज देत मृत्यूवरही विजय मिळवला अशा धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपणही राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
गुढीपाडवा आणि धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिन यांचा काहीही संबंध नाही. या दिवशी गुढी न उभारता भगवे झेंडे उभारा असे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ब्रिगेडि, नास्तिकतावादी यांनी धर्मविरोधी विचार प्रसूत करत आहेत. त्यामध्ये शुभ समजला जाणारा कलश उलटा का लावतात? असा प्रश्न असतो. मंदिरांचा कळस आपण बघतो ब्रह्मांडातील चैतन्य ग्रहण करून मंदिराच्या गाभाऱ्यातील पूजाकाला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे गुढीवर लावलेल्या कलशामुळे ब्रह्म लहरी त्यात आकृष्ट होऊन संपूर्ण वर्षभराची चैतन्यशक्ती संपूर्ण घराला मिळत असते, म्हणून गुढी ऊभारावी. क्रूरकर्मा औरंगजेब याने १६८९ मध्ये फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हाल हाल करुन छत्रपती संभाजी महाराजांना मारले हे सत्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये, यासाठी संभाजी महाराजांचे असे हाल केले गेले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी धर्म सोडला नाही आणि आत्ता निधर्मवादी सांगतात गुढी उभारू नका. पण औरंगजेबाचा इतिहास मात्र जाणीवपूर्वक लपवला गेला. त्यामुळे कितीही बुद्धिभेद करणारे लोक आले तरी आपण धर्मशास्त्रानुसार गुढी उभारायची आहे.
त्याचे अनेक दाखले महाराष्ट्रातील लिखित साहित्यिक संदर्भ मिळतात. पंडित म्हाइंभट सराळेकर यांनी १२७८ मध्ये आपल्या अध्यायामध्ये गुढीचा उल्लेख केलेला आहे. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत विष्णुदास नामा, समर्थ रामदास स्वामी सोळाव्या शतकात आपल्या अभंगामध्ये ही गुढीचा उल्लेख आहे. असे अनेक पुरावे गुढीपाडव्या बद्दल आपल्याकडे आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अदिती तवटे व कु.नारायणी शहाणे यांनी केले. श्री. प्रमोद परब यांनी सांगितलेल्या “हिंदू राष्ट्राच्या प्रतिज्ञेने”कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हर हर महादेव, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम, जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा अनेक घोषणा (चँटबॉक्सद्वारे) देऊन धर्मप्रेमींनी आपला प्रतिसाद दर्शवला.