*माझी वसुंधरा अभियानामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेला द्वितीय क्रमांक.

*माझी वसुंधरा अभियानामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेला द्वितीय क्रमांक…*

महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत भूमी, अग्नि, वायु, जल, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविणेत येते. 1 एप्रिल 2023 ते 31 में 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत, क वर्ग गटातून, लोकसंख्या 15,000 ते 25,000 असलेल्या नगरपरिषदामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेचा कोकण विभागात द्वितीय क्रमांक आलेला आहे. या गटामध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक श्रीवर्धन नगरपरिषद, ‌द्वितीय क्रमांक सावंतवाडी नगरपरिषद, तर तृतीय क्रमांक अलिबाग नगरपरिषदेस प्राप्त झालेला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेला 50 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानाचा मूळ उ‌द्देश पंचमहाभूतातील पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करून राज्याचा शाश्वत विकासाप्रती प्रयत्न करणे हा आहे. या उपक्रमाचा उ‌द्देश नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हा आहे. या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही त्या दृष्टीने विविध उपाययोजना हाती घेण्याचे सुनिश्चित केलेले आहे. या अनुषंगाने सावंतवाडी नगरपरिषदेने सदरहू अभियानामध्ये भाग घेऊन या अभियानामध्ये सावंतवाडी शहरात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष दिंडी काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलीत. हरित प‌ट्टे तयार केले. गोमय गणपती जनजागृती कार्यशाळा आयोजित केली. इको फ्रेंडली सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या दृष्टीने फटाके बंदी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे इत्यादी उपक्रम करण्यात आले. सायकल रॅली, मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, सायकल ट्रॅक बनविणे, रेन वॉटर हार्वेस्टींग, शोषखड्डे तयार करणे, विहिरींतील गाळ काढून स्वच्छता करणे, घनकचरा व्यवस्थापन, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक विषयांसंदर्भात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार केले, गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली, सीड बॉल तयार करून ते डोंगरात टाकण्यात आले. पर्यावरणपूरक सण साजरे करणे यामध्ये हळदीकुंकु समारंभामध्ये पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून कापडी पिशव्या देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी एलईडी पथदिवे बसविण्यात आले. तसेच न. प. मालकीच्या इमारतीवर सौरपॅनल बसविण्यात आले. शहरात उ‌द्यानाच्या ठिकाणी व न. प. कार्यालयाच्या ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन बसविण्यात आले. असे विविध उपक्रम करुन माझी वसुंधरा अभियानामध्ये भूमी, अग्नि, वायु, जल, आकाश या पाच घटकांवर काम करण्यात आले.

या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. सागर साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, सफाई मित्र, उ‌द्यान विभागातील माळी, कर्मचारी, तसेच, शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शिक्षक, वि‌द्यार्थी, विद्यार्थिनी, शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, बचतगट, शहरातील नागरिक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!