परिवहन महामंडळ आगारांच्या बेभरवशी वेळापत्रक व तकलादू कार्यपद्धतीमुळे प्रवाशांना होतोय मनःस्ताप..
तात्काळ उपायोजना करून जनतेला सुनियोजित सेवा देण्यासाठी मनसेने केल्या निवेदनाद्वारे सूचना
प्रतिनिधी – गणेश तोडकर
कुडाळ:२५- ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस.टी. लाल परीला करुणा विषाणू आपत्काल संचार बंदीचा प्रचंड आर्थिक फटका बसला असून राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन पूर्णतः कोलमडले आहे.कोरोना रुग्णांची संख्या जशी जशी कमी होत आहे तसं जनजीवन सुरळीत होत असताना प्रवासी पुन्हा एकदा एस टी प्रवासाकडे वळायला लागले आहेत.मात्र मनसेकडे आलेल्या तक्रारींनुसार परिवहन महामंडळाच्या आगारांचा नियोजनशून्य कारभार आणि ढिसाळ व बेभरोशी वेळापत्रक यांचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.गाड्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे दैनंदिन नियोजित फेरी मार्ग रद्द करावे लागत आहेत.अशा परिस्थितीत जनतेमध्ये एसटीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह घेत असून भविष्यात त्याचा आणखीन मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने या सर्वांची गांभीर्याने दखल घेऊन बसस्थानक नियंत्रकांनी व आगार व्यवस्थापकांनी प्रवासी फेऱ्यांबाबत दैनंदिन वेळापत्रकाचे सुनियोजन करावे व वेळापत्रकाची प्रसिद्धी
आगार व बसस्थानक परिसरात फलकांद्वारे करावी जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही,ग्रामीण भागांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावरून दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ फेऱ्यांचे नियोजन करावे,प्रवाशांना अधिक माहिती देण्यासाठी बस स्थानकात दोन नियंत्रक कर्मचारी नियुक्त करावेत अशा सूचना मनसेने कुडाळ आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.आगार प्रमुख श्री सुजित डोंगरे यांनी कर्मचारी तुटवड्यामुळे वेळापत्रक कोलमडत असल्याचे मान्य करून मनसेच्या सूचनांनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,विभाग अध्यक्ष सुंदर गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.