कणकवलीत नळयोजना पाईप लाईन फुटल्याने वातावरण तापले
नगराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची
पाईपलाईन फुटून गटार खचल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणार – सुशांत नाईक
कणकवली (प्रथमेश जाधव)
कणकवली शहरामध्ये रेल्वे स्टेशन रोडवर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम पूर्ण झाले होते. त्यावर भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो रस्ता सकाळी मोठी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खचला. यावेळी तत्परतेने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम पोहोचली आणि कामास सुरुवात केली होती. त्यावेळी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके ,तेजस राणे घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यावेळी जोरदार दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.
घटनास्थळी माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी कामाचा दर्जा काय? चुकीची कामे थांबवा,असे बोलताच ठेकेदार जावेद शेख यांनी त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठी बाचाबाची झाली. त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक सुशांत नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले या दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी झाली. त्यावेळी या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना देखील जाब विचारणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायतीने रेल्वे स्टेशन परिसरात गटासाठी खोदलेला रस्ता काम झाल्यानंतर भराव टाकून पूर्वत करण्यात आला. पण सोमवारी सकाळी आठच्या सुमारास या रस्त्या खचून कणकवली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यावर रस्ता पुन्हा खचला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, अन्यथा लोकांना त्रास झाला असता,असा टोला नगरसेवक कन्हैया पारकर यांनी लगावला.
विरोधी नगरसेवक तसेच सत्ताधारी नगरसेवक येथे दाखल झाले, यावेळी काम निकृष्ट करत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला, यावेळी सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी कडाडून विरोध करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला. पाइपलाइन कामास तत्परतेने सुरुवात करत लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून कणकवली शहरासाठी पाणीपुरवठा करणार असल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे नगरसेवक संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड, कन्हैया पारकर, तेजस राणे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.