मंगळसूत्र चोरीप्रकरणी पोलिस कोठडीत वाढ
मंगळसूत्र चोरीप्रकरणी पोलिस कोठडीत वाढ
प्रतिनिधी -: कुडाळ
येथील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे झालेल्या सोन्याच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातील अटकेत असलेल्या कर्नाटक-गांधीगंज येथील हसनी नासिर हुसेन ऊर्फ इराणी याच्या पोलिस कोठडीमध्ये एक दिवसाची वाढ झाली. उद्या (ता. १) त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कुडाळ येथील रियाना बंगलेकर या महिलेचे सोन्याचे दागिने इराणी याने चोरले होते. ही घटना १० सप्टेंबरला घडली होती. इराणी याला कुडाळ पोलिसांनी पकडून काल (ता. ३०) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
संशयिताला आज न्यायालयात हजर केले असता अद्याप मुद्देमाल मिळाला नसल्याने पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपासी सहाय्यक पोलिस डी. डी. माने यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार संशयिताला पुन्हा एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.