नेतर्डेच्या युवकाची ऑनलाइन फसवणूक…
बांदा पोलीसात तक्रार दाखल
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
नेतर्डे येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर युवकाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले आहे. तशा आशयाची तक्रार साहील संतोष कुबल (२१, नेतर्डे) याने बांदा पोलीसात दिली आहे. पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. हुलावळे करीत आहेत.
याबाबत बांदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेतर्डे येथील युवक साहील कुबल याने डिसेंबर २०२१ मध्ये लँड ऑफ फॅक्टस् या नावाने युट्यूबवर अकाउंट सुरु केले होते. यात मोटीव्हेशनल व शैक्षणिक व्हिडिओ शेअर करण्यात येत होते. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याने अकाउंट साईन आऊट केले. मात्र, त्यानंतर सदर अकाउंट ओपन झाले नाही. त्यामुळे सदर चॅनेल हॅक झाल्याचा त्याला संशय आला.
त्याबाबतची फिर्याद बांदा पोलीसात त्याने दिली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी) व ६६ (डी) अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी दिली. कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. हुलावळे पुढील तपास करीत आहेत.