दीपक पटेकर, मीनाक्षी व मृण्मयी v प्रथम सावंतवाडी रंगले काव्य संमेलन
दीपक पटेकर, मीनाक्षी व मृण्मयी v प्रथम
सावंतवाडी रंगले काव्य संमेलन
सावंतवाडी दि.२८ ऑगस्ट (प्रतिनिधी)
साहित्यिक कै.विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील कवींनी आपले काव्यरंग रंगले. यात प्रथम क्रमांक सावंतवाडीचे प्रतिभावंत कवी दीपक पटेकर यांनी पटकावला असून कवयित्री मीनाक्षी यांनी द्वितीय तर प्रा. मृण्मयी पोकळे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कवी संजय फडते, नवोदित कवयित्री प्रियांका पाटील, विद्या मोरे-सूर्यवंशी, अपर्णा गावडे, सानिका गोसावी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
श्रीराम वाचन मंदिरात कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. जी. ए. बुवा होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, प्रभाकर भागवत यांचे सुपुत्र रवींद्र भागवत, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,
कवी विठ्ठल कदम, भरत गावडे तसेच स्पर्धेचे परीक्षक डॉ. दीपक तुपकर, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी,आरती कार्लेकर, यांच्यासह सिंधुदुर्ग व गोव्यातील कवी – कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवींनी उधळले काव्यरंग :-अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कवी संमेलनात महाराष्ट्र आणि गोव्यासह कवी – कवयित्रींनी सहभागी होऊन आपले काव्यरंग उधळले. यात ज्येष्ठ कवी बबन हेवाळेकर, शमिका नाईक, रामचंद्र डोईफोडे,तनिष्का जाधव, मीनाक्षी, सानिका गोसावी, राजेंद्र गोसावी, मुकुंद पिळणकर, संतोष पवार, संजय घाडी, प्रियंका पाटील प्रशांत पाटील, मालवणी कवी मनोहर परब, रामदास पारकर यांच्यासह आदिती मसुरकर, प्रा. मृण्मयी पोकळे, अपर्णा गावडे, स्वप्ना गोवेकर, विद्या मोरे- सूर्यवंशी, दीपक पटेकर, ज्येष्ठ कवी रामदास पारकर, खास पर्वरी येथून सहभागी झालेले गोव्यातील नामवंत कवी संजय फडते आदी सहभागी झाले होते.
दरम्यान मान्यवरांनी उपस्थितांना काव्य लेखनासंदर्भात मार्गदर्शन व सूचना केल्या.
कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री व लेखिका उषा परब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दरवर्षाप्रमाणे यंदाही कविवर्य भागवत विद्याधर भागवत यांच्या लेखन परंपरेला समृद्ध करण्यासाठी सदर काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जी. ए. बुवा म्हणाले की विद्याधर भागवत म्हणजे हे व्यक्ती नसून ते एक महामुनी होते. आपल्या लेखन परंपरेच्या अनुषंगाने आज कोकणच्या मातीतला साहित्य संस्कार जोपासण्यासाठी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अशा स्पर्धा आयोजित करणे, म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहने आहे.
विद्याधर भागवत यांचे नातू रवींद्र भागवत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भरत गावडे यांनी केले.
फोटो
साहित्यिक कै विद्याधर भागवत काव्य मैफिल रंगली. डॉ जी ए बुवा,उषा परब व अन्य