बळीराजासाठी “एक दिवस” उपक्रमांतर्गत रानबांबुळी सिमरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानबांबुळी सिमरेवाडी कसाल नंबर एक शाळेने बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. मुलांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीविषयक माहिती घेत शेतातील विविध कामांचा आनंद लुटला.
साहजिकच बालवयात शेतीची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी आधुनिक शेतीकडे वळतील. विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्धल आदर निर्माण व्हावा,शेती विषयी माहिती मिळावी,शेतीचे महत्व, बी बियाणे,शेतीची अवजारे, खते,कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,पालक सर्वांनी शेतीत जाऊन, एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुलांना शेतीविषयी माहिती देत,शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ,शेतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी तरवा काढणे, लावणी, प्रात्यक्षिक करून शेतीचा आनंद घेतला. मुल सुद्धा शेतीच्या कामात रमलेली दिसून आली. या वेळी शिक्षक शेळके सर सुळ सर अंगणवाडी सेविका अनुष्का भोगवेकर मदतनीस अनुपा मयेकर कृषी अधिकारी खराडे आदी सह विद्यार्थी पालक कृषी सहाय्यक उपस्थित होते.