सुवार्डा डोंगराच्या शिखरावर पहिली होळी उभारुन मळगांव गावच्या शिमगोत्सवाला प्रारंभ…

 

गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जपत आहेत असंख्य वर्षांची परंपरा

 

सावंतवाडी, दि.१८:-मळगांंव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगाव गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जपत आले आहे.

मळगांव गावातील मानाच्या होळीसाहीत सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव संपल्यावर एका महिन्यानंतर चैत्र पौर्णिमेला होळी तोडण्यात येते. मात्र सुवार्डा डोंगरावरील ही होळी पुढील होळीपौर्णिमा सण येपर्यंत दिमाखात उभी असते, हे या होळीचे एक खास वैशिष्ट्य आहे.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर (मानकरी) सवाद्य वाजत गाजत येथील सुवार्डा डोंगरावर गेले. तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे विधिवत पूजन करून ते होळीसाठी तोडण्यात आले. नंतर वाजतगाजत मानकऱ्यांच्या उपस्थितीत होळी सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आणून तिला सजविण्यात आले. त्यानंतर तेथेच डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची पहिली होळी उभारण्यात आली. होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. ग्रामस्थांनी होळीला नारळ, पेढे, नवसाचे नारळाचे तोरण ठेवले. नवसाचे गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना पेढा व प्रसाद वाटप करण्यात आले. सुवार्डा डोंगरावरील कार्यक्रम आटोपल्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मायापूर्वचारी मंदिर परिसरात होळी उभारण्यात आली. सायंकाळी मळगाव गावची मानाची होळी मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील वाडी-वाडीत होळ्या उभारण्यात येणार आहेत. मळगाव गावचा शिमगोत्सव सात दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!