तौक्ते चक्रीवादळात घर जमीनदोस्त झालेल्या कोळंब येथील परब दाम्पत्याला सिंधुमित्र प्रतिष्ठानचा मदतीचा हात
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हाहाकार उडाला. वेंगुर्ले , मालवण या तालुक्यात अपरिमित हानी झाली. बागायती नष्ट झाल्या, घरे पडली, पत्रे उडाले. अनेक जणांची स्थिती तर होत्याचे नव्हते झाले, अशी झाली. त्यावेळी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत कार्य केले.
तौक्ते चक्रीवादळात ज्यांची घरे कोसळली यात मालवण तालुक्यातील कोळंब येथील नरहरी विष्णू परब यांचा देखील समावेश होता. घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने पत्रे कवले तुटली, यामुळे आजोबा – पणजोबांनी बांधलेले मातीचे घर जवळजवळ जमीनदोस्त झाले. त्यांना शेजारील घरात आश्रय घ्यावा लागला. ते स्वतः मच्छीमारी बोटीवर रोजंदारीवर जातात. पत्नी अपंग असून मुलगा शिकत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घर बांधणे शक्य नव्हते. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्यांच्या घराला प्लास्टिक बांधून दिले त्यामुळे त्यांची तात्पुरती राहायची सोय झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे कार्यकर्ते डॉ. पंकज दिघे यांच्या माध्यमातून त्यांनी आवश्यक मदतीसाठी सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानला अर्ज केला.
कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केल्यानंतर, त्यांना आवश्यक बांधकामासाठी रुपये पन्नास हजार इतकी मदत देण्यात आली. पुढील आवश्यक मदत देखील त्यांना देण्याचा मानस प्रतिष्ठानचा आहे. यासाठी मुंबई येथील प्रतिष्ठानच्या दात्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. श्री परब यांना रुपये पन्नास हजारांचा धनादेश डॉ.पंकज दिघे यांचे हस्ते श्री पवन बांदेकर, श्री भार्गवराम शिरोडकर, सीए लक्ष्मण नाईक, श्री अँड्र्यू फर्नांडिस तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे तसेच कोळंब ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आला. कोळंब येथील श्रीकृष्ण मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या अनपेक्षित मदतीमुळे परब कुटुंबीय भारावून गेले व लवकरच बांधकाम सुरू करू असे आश्वासन त्यांनी दिले.
सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान ही सिंधुदुर्गातील समाजसेवा करणारी अग्रणी संस्था असून, संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. यात अनेक शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक जागरण तसेच गरजूंना आवश्यक मदत देखील केले जाते. संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र चालविले जाते. याचा लाभ आजपर्यंत शेकडो रुग्णांनी घेतला आहे.
आता सिंधुमित्रांनी पुन्हा एकदा आपला सेवाभाव जपत सामाजिक कार्यात निरंतरता राखली आहे.