शहीद कौस्तुभ रावराणे यांचा तृतीय स्मृतीदिन साजरा
वैभववाडी प्रतिनिधी
प्रत्येक सैनिक देशाचे संरक्षण करत असतो. शाहिद कौस्तुभ रावराणे यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे.त्यांचे बलिदान तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले.
शहीद कौस्तुभ रावराणे यांचा तृतीय स्मृतीदिन येथील आनंदीबाई रावराणे कला व वाणीज्य महाविद्यालयात कौस्तुभप्रेमीच्या माध्यमातुन साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव,कौस्तुभचे काका विजय रावराणे,संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जन रावराणे,सचिव प्रमोद रावराणे,प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे,बँकेचे संचालक दिगबंर पाटील,संतोष सावंत,उपप्राचार्य.बी.डी.इंगवले,प्रा.एस.एन.गवळी,प्रा.एस.एन.पाटील,आदी उपस्थित होते.
प्राचार्य श्री.काकडे म्हणाले शेतकऱ्यांच्या अपार कष्टामुळेच आपल्या समोर जेवणाचे ताट उपलब्ध होते.त्यामुळे क्षणोक्षणी शेतकऱ्यांची आठवण आणि त्याच्यांविषयी आदर ठेवलाच पाहीजे.त्याचप्रमाणे आज आपण निवांत झोपु शकतो कारण सीमेवर डोळ्यात तेल घालुन आपले सुरक्षारक्षक पहारा देत आहेत.त्यामुळे शेतकरी आणि सैनिकांचा कायम आदर केला पाहीजे.प्रमोद रावराणे म्हणाले कौस्तुभचे कार्य इतके मोठे आहे ते सांगण्यासाठी शब्दच अपुरे आहे.महाविद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सर्वसोयीनीयुक्त क्रीडासंकुलाला कौस्तुभ रावराणे यांचे नाव देण्यात येणार आहे.मुंबईत झालेल्या एका बैठकीत आपण सुचविल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका मिनिटांत हा निर्णय जाहीर केला.त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानले पाहीजे.या क्रीडा संकुलाचे उद्घाटन लवकरच होईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.कौस्तुभ रावराणे हे खरोखरच वैभववाडीच्या कोंदणातील चमकता हिरा होता.त्यामुळे त्यांचा इतिहास देशभरात पोहोचविण्यासाठी साहीत्यांची निर्मिती व्हायला हवी असे त्यांनी आवाहन केले.
संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जन रावराणे यांनी देखील कौस्तुभ रावराणेंना आदराजंली वाहीली.आदराजंली वाहील्यानंतर शहीद रावराणे यांच्या जीवनपटावर आधारीत आणि वैभववाडीच्या कोंदणातील हिरा कौस्तुभ रावराणे या विषयावर एका विद्यार्थीनीने लिहीलेल्या निबंधाचे वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संजीवनी पाटील तर आभार संजय रावराणे यांनी मानले.
फोटो – शहीद कौस्तुभ रावराणे यांना श्रद्धांजली वाहताना उपस्थित पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सज्जन रावराणे,प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे,विजय रावराणे,प्रमोद रावराणे ,दिगंबर पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते. छाया संजय शेळके वैभववाडी