अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा व मेडीव्हीजन यांच्या सहकार्याने चिपळूणमधील पूरग्रस्त भागात महा आरोग्य अभियान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा व मेडीव्हीजन यांच्या सहकार्याने चिपळूणमधील पूरग्रस्त भागात महा आरोग्य अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण मधील पूरग्रस्त भागातील २० हजार पेक्षा अधिक नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेतून सावरतो न सावरतो ते कोकणावर महापुराचे संकट आले आहे. आज या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कंबर कसून उतरली आहे. चिपळूण मधील पूरग्रस्त भागात भोजन वाटप, पाणी वाटप, रेशन कीट वाटप इत्यादी सेवा अहोरात्र पुरवत आहे. तसेच वैद्यकीय सेवा व प्राथमिक उपचार पुरविण्यात येत आहेत. विशेषत अनाथाश्रम, गर्भवती महिला अशा लोकांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरविण्याचे सेवाकार्य अभाविप करत आहे. पूर परिस्थितीमुळे घरे, दुकाने यांच्या साफसफाई साठी कार्यकर्ते सेवा पुरवत आहेत.
तसेच विद्यार्थी परिषद जिज्ञासा व मेडीव्हीजन यांच्या सहकार्याने महा आरोग्य अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण मधील पूरग्रस्त भागातील २० हजार पेक्षा अधिक नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. हे अभियान पूरग्रस्त भागातील विविध ५० स्थानांवर राबविण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे पालकत्व विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप सुध्दा अभाविप करणार आहे.
या सेवाकार्यात सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आले आहे. या आगोदरही निसर्ग चक्रीवादळ, तोत्के वादळ अशा अनेक मोठ्या संकटांवर मात करून कोकण नव्याने उभे राहिले आहे आणि आजही या पूर परीस्थितीतून कोकण नक्कीच नव्याने उभे राहिल. या पूर परीस्थितीत नागरीकांना सेवा देण्यात विद्यार्थी परिषद नेहमीच कटीबद्ध राहिल असे मत उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक मृणाली गुरव यांनी यावेळी व्यक्त केले.