सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा कर्तव्य दक्षतेमुळेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
- गांजा विक्री च्या मुळापर्यंत पोहोचल्यास मोठे मासे लागणार गळाला
- अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करायचे असेल तर त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे
- वृक्षाच्या मुळाशी घाव घातला की फांद्या आपोआपच खाली येतील, हे तत्व अवलंबिणे गरजेचे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे राजेंद्र दाभाडे यांनी हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग पोलिसांमध्ये जान आल्याचे चित्र निर्माण झाले आहे, गेल्या वर्षभराच्या आपल्या कारकिर्दीमध्ये दारू माफियांना मोका, तसेच गांजा, अवैद्य मालवाहतूक प्रकरणी ,पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे कोट्यावधी रुपयांची दारू जप्त करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्ष राजरोसपणे सुरु असलेली गांजा, चरस ,विक्री यालाही मोठ्या प्रमाणात पाय बंद घालण्याचे काम पोलीस अधीक्षकांच्या मार्फत केले जात आहे,काल जी गांजा विक्री प्रकरणी धडक कारवाई करून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे श्रेय फक्त आणि फक्त पोलीस अधीक्षकांनाच जाते, कारण ही कारवाई यापूर्वी का झाली? गेली अनेक वर्ष सुरु असलेली गांजा विक्री च्या मुळापर्यंत पोलीस का पोहचू शकले नाहीत हा ही एक संशोधनाचा विषय होता,मात्र पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांचा बीमोड करण्याच्या सक्त सुचना दिल्यावर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली,व गुन्हे अन्वेषण शाखा असुदे सी आय डी शाखा असू दे सर्व पोलीस अधिकारी कामाला लागलेत त्याचेच फलित हे दिसत आहे.
सावंतवाडी शहरातच नव्हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यात गांजा विक्री होत असल्याची तक्रार गेली अनेक वर्ष होत असताना त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही,आम्ही यावर वारंवार लिखाण केले,मात्र कोणालाही जाग आली नाही, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मात्र हे लिहितात म्हणजे शंभर टक्के नसले तरी पन्नास टक्के तरी सत्य असणार असे गृहीत धरून आपल्या पोलिस अधिका-यांना तशा सक्त सूचना दिल्या व कारवाईचे सत्र सुरू झाले, काल गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी सुनील धनावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा सापळा रचून पर्दाफाश केला असला, तरी त्यातील मुख्य सूत्रधार हा वेगळाच असल्याचे आमचे ठाम मत आहे. व या रॅकेटमध्ये ४० ते ५० युवकांचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन अल्पावधीत अब्जाधीश झालेल्यांची चौकशी यानिमित्ताने केल्यास बरच काही उघड होईल असे आमचे ठाम मत आहे, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केल्यास यातील मुख्य सूत्रधार पकडला जाईल व या गांजा विक्रीचे मूळ उगम स्थान उघड होईल असे आम्हाला वाटते, मयुर कांडरकर, आशिष कुलकर्णी ,अतुल गवस यांना गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली असली तरी यातील फैजल बेग या सुत्रधाराच्या पाठीमागे एक मोठा सूत्रधार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
त्या सुत्रधाराच्या मुळापर्यंत पोलीस पोहचल्यास खऱ्या अर्थाने या गांजा विक्री प्रकरणाचा पर्दाफाश होईल असे आम्हाला वाटते, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात उच्चभ्रू कुटुंबातील ही मुले आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत, बड्या बड्या घराण्यातील राजकीय वरदहस्त असलेली ही मुले पैसा व श्रीमंतीच्या जीवावर आम्ही वाटेल ते करू शकतो असा गोड गैरसमज करून आज वावरत आहेत त्यांना जागेवर आणण्यासाठी वेळीच वेसण घालण्याची गरज आहे, त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या गांजा विक्रीचा बीमोड करावा अशी आमची मागणी आहे, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याप्रकरणी निश्चितच कठोर पावले उचलत ठोस कारवाई करतील असा आमचा विश्वास आहे.
सावंतवाडी शहरातील जवळपास ३०ते ४० मुले या गांजा विक्री प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळत आहे, यातील काही मुले भूमिगत झाली असून शहराच्या आसपास रिकाम्या इमारती राहत असल्याची माहिती आहे, पोलिसांनी या मुलांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचे लोकेशन तपासल्यास ही मुले सध्या कुठे आहेत याचा पत्ता पोलिसांना लागू शकतो, कोणताही राजकीय दबाव आला तरी तो झुगारून पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडावे व या अवैद्य प्रकरणाचे समूळ उच्चाटन करावे अशी आमची रास्त मागणी आहे, व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे कार्य पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे.

