मंदिरातील गुरव पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा.
वैभववाडी प्रतिनिधी
मंदिरातील गुरव पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा. तसेच कोरोना महामारीत त्यांचा फ्रंट लाईन मध्ये समावेश करा. या मागणीचे निवेदन गुरव ज्ञाती बांधव समाज जिल्हाध्यक्ष संजय सावंत- गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. सदर निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
राज्य सरकारने या महामारीत इतर सर्व ठिकाणचे निर्बंध हटविले आहेत. हॉटेल, मॉल गार्डन सुरू केली आहेत. मात्र हिंदू धर्माचे श्रद्धा स्थान असलेली मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या गुरव पुजाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा. तसेच फ्रंट लाईन मध्ये त्यांना समावेश करा व त्यांचे लसीकरण त्वरित करा असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी प्रदेशयुवा मानद अध्यक्ष महेश गुरव, जिल्हा युवा अध्यक्ष सदाशिव (राजु) गुरव, कुडाळ तालुका अध्यक्ष अभिनव गुरव व गुरव समाज बांधव उपस्थित होते.

