भुईबावडा, करुळ घाटाची आमदार नितेश राणेंकडून पाहणी
वैभववाडी प्रतिनिधी
खचलेल्या करूळ व भुईबावडा घाट मार्गाची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली.करुळ घाटात खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतली आहे. संबंधित कामाबाबत अधिकाऱ्यांकडून आमदार नितेश राणे यांनी आढावा घेतला. घाटमाथा व कोकण यांना जोडणारा हा प्रमुख घाट मार्ग आहे. या घाटाकडे विशेष लक्ष द्या. आपत्तीच्या कालावधीत घाट मार्गात कायमस्वरूपी जेसीबी उपलब्ध असला पाहिजे. गटारे मातीनी भरली आहेत. त्यामुळे पाणी रस्त्याने वाहत आहे. गटारे साफ करून घ्या. घाट मार्गाकडे झालेला दुर्लक्ष खपवून घेतला जाणार नाही. असे अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितले. आमदार नितेश राणे यांचा मंगळवारी पाहणी दौरा जाहीर होताच अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.मंगळवारी कामांमध्ये देखील गती प्राप्त झाली होती. अधिकारी उभे राहून काम करून घेत होते.
दि. 12 जुलै रोजी करूळ घाटातील मोरीचा भाग खचला. त्यामुळे प्रशासनाने हा घाट मार्ग बंद ठेवला आहे. या मार्गावरील संपूर्ण वाहतूक 26 जुलै पर्यंत फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 13 जुलै रोजी आमदार नितेश राणे यांनी असलेल्या रस्त्याची पाहणी केली होती. सदर घटना ही प्रशासन निर्मित आहे. याला जबाबदार संबंधित अधिकारी असल्याचे सुनावत अधिकाऱ्यांची घाटातच खरडपट्टी काढली होती. सदर मार्ग तात्काळ दुरुस्त करा व वाहतूक पूर्ववत करा. अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना त्यावेळी दिल्या होत्या. पुन्हा या कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मंगळवारी दुपारी आमदार नितेश राणे यांनी पुन्हा घाटाची पाहणी केली. दरम्यान सुरू असलेल्या कामाचा त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी सभापती दिलीप रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार श्रीमती कासकर, राष्ट्रीय महामार्ग चे अधिकारी श्री ओटवणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, मंडल अधिकारी दीपक पावसकर, माजी नगरसेवक संताजी रावराणे, सुनील भोगले, आशिष रावराणे, पोलीस श्री. राठोड, मारुती साखरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.