राजापूरात शिवसेनेला भाजपचा दे धक्का…..
*प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
राजापूर दि. ४ जुलै :-
आज राजापूर येथे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सागवे विभागातील सुमारे ७० ते ८० शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
शिवसेनेच्या उदासीन तसेच दूरदृष्टी नसणाऱ्या, प्रामाणिकपणाची कदर न करणाऱ्या आणि सर्वच उद्योगांना सरसकट विरोध करून सामान्य नागरिकांच्या जीवावर मोठेपणा मिरवणाऱ्या पक्षनेतृत्वाला कंटाळून आणि कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजप प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया प्रवेशकर्त्यांनी दिली.
भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या शिवसैनिकांमध्ये प्रामुख्याने माजी विभागप्रमुख राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, सुहास कुवरे, राजू वेलणकर, शिवा वेतकर, बाबू मेस्त्री, भाई देसाई यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे.
भाजपा महाराष्ट्र राज्य सचिव आणि रत्नागिरी जिल्हा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेच्या खासदारांवर अकार्यक्षम असल्याचा आणि आकसाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच रिफायनरी प्रकल्प नियोजित स्थळी होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राणपणाने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र राज्य सचिव व रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राजापूर चे खासदार विनायक राऊत यांचा अदूरदर्शीपणा, मनमानीपणा, राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे दुटप्पी धोरण आणि उपऱ्यांचा अवास्तव वावर या सर्व बाबींना कंटाळून तसेच कोणताही विकास शिवसेना नेत्यांकडून होणार नाही याची खात्री पटल्याने आम्ही माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया पंढरीनाथ आंबेरकर आणि राजा काजवे यांनी दिली असून सदर प्रवेश हा ट्रेलर असून उर्वरित सिनेमा लवकरच दाखवणार असल्याचे या द्वयींनी सांगितले.