कोरोनामुळे छत्र हरपलेल्या सोळा मुलांना “माय राजापूर” ने दिला मदतीचा हात आणि धारतळे कोविड सेंटरलाही केली मदत..
*कोरोनामुळे छत्र हरपलेल्या सोळा मुलांना “माय राजापूर” ने दिला मदतीचा हात आणि धारतळे कोविड सेंटरलाही केली मदत..*
प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
राजापूर दि. २९ जून –
कोरोनाच्या प्रादुर्भावाने छत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील मुलांपैकी सोळा मुलांना “माय राजापूरने” मदतीचा हात दिला आहे. तसेच धारतळे कोविड सेंटरलाही वस्तूरूपाने मदत केली आहे. या सोळा मुलांपर्यंत महीनाभराचे अन्नधान्य, शालेय साहीत्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेऱ्या आखण्यात आल्या होत्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना व कोंडये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तर दुसऱ्या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी आडीवरे येथील वारिक कुटुंबीयाना माय राजापूर या संस्थेने मदत केली.
माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वत: कडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कायार्साठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात कोविड सेंटर धारतळे ला दिलेल्या मदत निधीचा देखील समावेश आहे. अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबाची या कोरोनाच्या आघाताने फरफट झाली आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्कातून त्यानी सावरावे व आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्य त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करत होते. पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसं होणार म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्राच्या प्राध्यापिका सौ. दिपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महीला सदस्यानी पुढाकार घेतला व या हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क देखील राखला. यापुढेही अश्या अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर व अध्यक्ष जगदीश पवार यांनी बोलून दाखवला.
समाजातील सर्व स्तरातून “माय राजापूर” संस्थेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.