राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय अखेर सुरू..
प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
राजापूर दि. २९ जून :-
तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरु झाले असुन गेल्या पाच दिवसांत सुमारे ५१ नागरिकानी पासपोर्ट कार्यालयात येवुन पासपोर्टची नोंद केली आहे. सुमारे तीन वर्षांपुर्वी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातुन व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याना सोयीस्कर ठरेल असे पासपोर्ट सेवा केंद्र राजापुर पोस्ट कार्यालयात सुरु झाले. दोन जिल्ह्यातील नागरिकानी या सेवा केंद्राच्या माध्यमातुन पासपोर्ट काढले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रदीर्घकाळ हे सेवाकेंद्र बंद होते. आता ते पुन्हा सुरु झाल्यावर नागरीकांनी येथे येवुन आपापल्या पासपोर्टची नोंद केली आहे. दररोज चांगली गर्दी होत आहे. मध्यंतरीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढु लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा बंद होते. परंतू आता ते पुन्हा सुरु झाले असून जवळपास ५१ नागरिकानी पासपोर्टसाठी अर्ज केले असल्याची माहिती या केंद्राकडुन देण्यात आली. कोकणातील दोन जिल्ह्यांतील नागरिकाना मध्यवर्ती ठरणाऱ्या अशा या केंद्राचा चांगलाच फायदा होत आहे.

