पाडलोसमध्ये बागायतीत घुसला बिबट्या
पाडलोसमध्ये बागायतीत घुसला बिबट्या
– बागायतदारांत भीतीचे वातावरण . बंदोबस्त करण्याची मागणी
बांदा : प्रतिनिधी:शैलेश गवस
पाडलोस माडाचेगावळ येथील तुकाराम गंगाराम गावडे यांच्या काजू व नारळ बागायतीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास बिबट्या घुसला. त्याचदरम्यान तेथून जात असलेले बागायतदार राजू शेटकर यांच्या निदर्शनास सदर बिबट्या पडताच त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. दोन दिवसांतून एकदा तरी रानटी जनावरे आपल्या बागायतीत शिरत असल्याने वनविभागाने योग्य ती उपाययोजना करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी राजू शेटकर यांनी केली.
पाडलोस भागात गवारेड्यांचा उच्छाद कमी होत असतानाच आता वन्य रानटी प्राण्यांनी त्यात उडी घेतली आहे. माडाचेगावळ भाग डोंगरानजीक असल्यामुळे या ठिकाणी रानटी प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. सदर वाडीतील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबट्या वस्तीनाजीक येतो. शुक्रवारी सकाळी राजू शेटकर हे आपल्या बागेत जात असताना त्यांना डोंगरातून बागायतीत बिबट्या उतरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आरडाओरड करत ग्रामस्थांना बोलाविले. मात्र बिबट्याने त्याक्षणी जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. बिबट्यांसह अन्य रानटी प्राणी वारंवार बागायतीत येत असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असल्याचेही श्री.शेटकर म्हणाले. दरम्यान, गेल्यावर्षी याच ठिकाणी बिबट्याने बंटी गावडे यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला होता. वनविभागाने अशा धोकादायक प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांमधून केली जात आहे.