आरोग्य कर्मचारी,सरकारी कर्मचाऱ्यांनी कोलगांवातील राजकीय दहशतीला घाबरु नये-मायकल डिसोजा
*सावंतवाडी-:* कोलगाव येथील सरकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दहशतीला घाबरून न जाता बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये, सर्व कर्मचाऱ्याचा पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा यांनी सरकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात त्यांनी असे म्हटले की कोरोना महामारित पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोलगाव आणि सांगेली भागात लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही स्वयंघोषित राजकीय पुढारी त्रास देण्याचे काम करत आहे. हे कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही. असा इशारा मायकल डिसोजा यांनी दिला आहे.
कोलगाव मध्ये पाच वर्षापूर्वी जी परिस्थिती होती. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यावेळी देखील गावात कोणतेही अधिकारी यायला तयार नव्हते. परंतु सेनेची सत्ता आल्यानंतर अनेक चांगले अधिकारी या गावात आले. परंतु आताची परिस्थिती बघता, ग्रामसेवक सुट्टीवर गेले असून, ग्रामपंचायत कर्मचारी राजीनामे देत आहेत. चांगले शिक्षक गावात यायला तयार नाही आहेत. कोलगावातील वायरमन ला दमदाटी केली जात आहे. हे वेळीच थांबले नाही तर त्याचे परिणाम गावच्या विकासावर होणार आहेत. त्यामुळे ही दहशतवादी वृत्ती थांबली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या अन्यायाचा पाढा सर्वसामान्य जनतेसमोर वाचावा लागेल आणि तुमच्या विरोधात लोक चळवळ उभारावी लागेल असा इशारा मायकल डिसोजा यांनी विरोधकांना दिला आहे.

