मडुरा सातोसे मार्गावर डंपर रुतला……

*◾सुदैवाने जीवितहानी टळली ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघात..*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१९ :-* मडुरा-सातोसे मार्गावरील भोवाडे येथे तिलारी पाटबंधारे कालव्यासाठी रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. परंतु केवळ मातीच्या साहाय्याने चर भरून काढल्यामुळे खडी वाहतूक करणारा डंपर रुतला. डंपरची दोन्ही पुढील दोन्ही चाके चार ते पाच फूट उंच जात असल्याचे पाहून चालकासह क्लिनरने उडी मारली अन् जीवित हानी टळली. परंतु डंपरचे व मालाचे मोठे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सदर अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खोदाई केलेल्या भागावर खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तिलारी कालव्याचे बांधकाम मडुरा परिसरात गेले अनेक महिने सुरू आहे. मडुरा सातोसे मार्गावरून जाणारा ट्रक भोवडे येथील वळणावर आला असता खोदाई करून मातीच्या साहाय्याने बुजविण्यात आलेल्या चरात रुतला. डंपरची पाठीमागची चाके अचानक खोलवर जाऊ लागली तर हळूहळू पुढील दोन्ही चाके सुमारे चार ते पाच फूट वर उचलली. पुढील होणारा अपघात लक्षात येताच चालकाने गाडी जागच्या जागी थांबवली व क्लीनरसह स्वतः बाहेर उडी घेतली. अशा तकलादू कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे असे अपघात होत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला.
संध्याकाळी उशिरापर्यंत डंपर बाहेर काढण्याचे काम सुरू होते तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशा तकलादू काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय का देतात? याच्या पाठीमागील गमक काय? असा सवाल आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनास केला. तसेच सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर धोकादायक काम करण्याची परवानगी कशी काय दिली जाते असे सांगत पाऊस सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण रस्ता निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!