सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेवर लादला जात असलेला ‘जनता कर्फ्यु’ हे पालकमंत्र्यांचे पाप – महेश धुरी
🖥️ Kokan Live Breaking News
✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड
🎴सावंतवाडी : दि. ०८ जिल्ह्यात वेगाने वाढणाऱ्या कोविड संसर्गामुळे आतापर्यंत वर्षभरात १४ हजार २९१ रुग्ण कोविड बाधित आढळले आहेत. तर गेल्या महिन्याभरात नवीन ७,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ३३६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सद्यस्थितीत ३२१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील २८२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. म्हणजेच काही दिवसात कोविड बळींच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी प्रतिक्रिया सावंतवाडी तालुका भाजप अध्यक्ष महेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी तालुक्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा घेऊन, दि. ०६ मे ते दि. १५ मेपर्यंत ‘जनता कर्फ्यु’ जाहीर केला आहे. यावेळी तालुक्यात कुठलाही धार्मिक उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मेडिकल व आरोग्यसेवा याव्यतिरिक्त अन्य कुठलेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे, असेही धुरी म्हणाले.
गेल्या १४ महिन्यात कोविड विषाणु संपुर्ण राज्यासह जिल्ह्यात धुमाकुळ घालत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागात पुरेशा सोयी – सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात आर. टी. पी. सी. आर. चाचणी अहवाल ४ ते ५ दिवस उशिराने येत असल्याने, त्याचा अहवाल प्रलंबित आहे. ती व्यक्ती अहवाल येईपर्यंत फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे. तसेच अहवाल उशिरा येत असल्याने जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तींवर उपचार केले जात नाही, त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आर. टी. पी. सी. आर. टेस्ट फक्त जिल्हा रुग्णालयात केली जाते. त्यामुळे स्थानिक आमदार आणि पालकमंत्री जिल्ह्यासाठी मोठमोठे आर्थिक पॅकेज आणल्याचे सांगुन, सर्वसामान्य जनतेची दिशाभुल करत आहेत. त्यापेक्षा आरोग्य विभागात सोयी सुविधा उपलब्ध केल्या असत्या, तर आज जनतेवर ‘जनता कर्फ्यु’ लादण्याची वेळ आली नसती. त्यामुळे नाईलाजाने जिल्ह्यातील जनतेवर लादला जात असलेला ‘जनता कर्फ्यु’ हा पालकमंत्र्यांचे पाप आहे, असे म्हणावे लागत आहे.

