समाजसेवेचे व्रत जपलेला अवलिया
*डिंगणे गावचे सुपुत्र दत्ताराम शेटकर यांनी ठेवला नवीन आदर्श*
*’हाकेला धावून जाणारे भावोजी’ म्हणून पंचक्रोशीत ख्याती*
*तहसीलदार राजाराम म्हात्रेंनी काढले गौरवोद्गार*
सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे या गावचे सुपुत्र व माजी सरपंच श्री.दत्ताराम (भावोजी)शेटकर यांनी कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कार्य केले त्याच्यासाठी त्यांना व प्रत्येक कार्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ.सुवर्णा शेटकर यांना श्री.विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे ‘कोरोना देवदूत’हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सावंतवाडी तहसीलदार श्री.राजाराम म्हात्रे,वनक्षेत्रपाल(रेंजर)श्री. गजानन पानपट्टे,विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर,युवा रक्तदाता संघटनेचे श्री.देव्या सूर्याजी,डिंगणे उपसरपंच श्री.जयेश सावंत,इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
श्री.शेटकर यांनी कोरोना काळात सर्वसामान्य जनता, शेतकरी,परप्रांतीय कामगार,मुकी जनावरे अशा सर्व स्तरात मदत करत माणुसकी जपली होती कोरोना सुरुवातीच्या काळात मास्क,साबण,सॅनीटायझर इत्यादी वाटत जनतेमध्ये कोरोनाचे भय घालवण्यासाठी जनजागृती केली होती.तसेच परप्रांतीय कामगारांना जेवण,पैसे यांसारखी आर्थिक,भावनिक मदत करत त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले होते.तीन वर्षांपूर्वी सातारा-सांगली भागात दुष्काळ पडला होता,तेथे मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला होता.भावोजींच्या घरी मदतीसाठी गेल्यावर कधी कुणी रिकाम्या हातानी परतून येत नाही.’गोरगरिबांचे आश्रयदाते,गोरगरिबांचे कैवारी, एका हाकेवर मदतीसाठी धावून जाणारे भावोजी’अशी त्यांची सर्वत्र ख्याती आहे.ते गेली कित्येक वर्षे समाजकार्यात आघाडीवर असतात.त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे.त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहत आले आहेत.
“अशा समाजसेवकांचा सत्कार करायला मिळणे हे आमचे भाग्य आहे, शेटकर यांचे कार्य अतुलनीय आहे यापासून तरुणांनी नक्कीच प्रेरणा घ्यावी”,असे गौरवोद्गार तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी काढले.वनक्षेत्रपाल श्री. पानपट्टे म्हणाले,”शेटकर हे सर्वसामान्यांच्या हाकेला कधीही धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांचे कार्य गेली कित्येक वर्षे आम्ही पाहत आहोत”
परंतु श्री.शेटकर हे एका आजाराने त्रस्त आहेत.त्यामुळे आज त्यांच्या घरी जात श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.’श्री.विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे होऊ घातलेले सत्कार हे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर केले जातील’असे श्री.तळवणेकर म्हणाले.

