सामाजिक

*उपोषणाचा इशारा; आंबोलीतील चौडू पाटील यांचा प्रशासनावर गंभीर आरोप*

*उपोषणाचा इशारा; आंबोलीतील चौडू पाटील यांचा प्रशासनावर गंभीर आरोप*

*“दीड वर्षे उलटली तरी न्याय नाही; १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा”*
सावंतवाडी | प्रतिनिध :
तालुक्यातील आंबोली नांगरवाक येथील चौडु धोंडू पाटील यांनी महसूल व स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत १ मे २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी
कार्यालयासमोर उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप चौडू पाटील यांनी केला आहे.
*जमिनीच्या वादातून संघर्ष तीव्र*
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मौजे आंबोली येथील सर्व्हे क्रमांक ८४/अ/१/ड व ९३ मधील जमीन ही वडिलांच्या पश्चात वारसा हक्काने मिळालेली असतानाही त्यांचे भाऊ गणपत धोंडी पाटील व कुटुंबीय अडथळे निर्माण करत आहेत. घरासमोर सांडपाण्याचा खड्डा करून ये-जा रोखणे, तसेच बांधकामात अडथळे आणणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
*मारहाण, जीवितास धोका आणि तक्रारींकडे दुर्लक्ष*
२०२० पासून वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि जीवितास धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्याइतकी गंभीर जखम झाल्याचा उल्लेख असूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप आहे.
*बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणाचा आरोप*
संबंधित व्यक्तीने भावाकडून बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा आरोप करत ते तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच, शासनाच्या आदेशानंतरही बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचे सांगत खोदकाम भरून काढण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
*अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप*
मंडळ अधिकारी व कोतवाल यांनी संगनमत करून एकतर्फी पाहणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पाहणीसाठी जाणीवपूर्वक न बोलावणे, खोटे अहवाल सादर करणे, तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे.
*इंदिरा आवास योजनेतील अनुदानाचा मुद्दा*
मृत आईच्या नावावर मिळालेल्या इंदिरा आवास योजनेच्या अनुदानाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लाभार्थी मयत असतानाही रक्कम काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करत ती तात्काळ वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*१ मे रोजी आंदोलनाचा इशारा*
“१ मेपूर्वी सर्व मागण्या मान्य करून ठोस कारवाई झाली नाही, तर उपोषणासोबत आत्मदहन करणार,” असा स्पष्ट इशारा देत प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले आहे. दीड वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे चोंडू पाटील यांनी नमूद केले आहे.
*प्रशासनासमोर मोठे आव्हान*
या प्रकरणामुळे सावंतवाडी तालुक्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, १ मेपूर्वी योग्य तो निर्णय घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!