कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोठा बॅनर… थोडक्यात टळला मृत्यू! सावंतवाडीत ‘बॅनरराज’चा बळी होणार होता दुचाकीस्वार

मोठा बॅनर… थोडक्यात टळला मृत्यू! सावंतवाडीत ‘बॅनरराज’चा बळी होणार होता दुचाकीस्वार

 

सावंतवाडी :
मोठमोठे बॅनर लावून राजकीय शक्ती प्रदर्शन आणि फुकट प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासाची किंमत कुणाच्या तरी जीवाने चुकवावी लागली असती, अशी धक्कादायक घटना आज सावंतवाडीत घडली. शहरातील मोतीजालाच्या परिसरात दहीहंडीचा एक भला मोठा बॅनर अचानक तुटून रस्त्यावर कोसळला. त्यात कारिवडे येथील एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. सुदैवाने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने वेळीच ब्रेक लावल्याने मृत्यूचा थरार टळला.
याआधी तामिळनाडूच्या तिरुपती जिल्ह्यातील अमूर्नर येथे अशाच प्रकारच्या भला मोठ्या राजकीय बॅनरमुळे अपघात होऊन जीवितहानी टळली होती, याचा व्हिडिओ ‘कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज’ने दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. पण त्याचीच पुनरावृत्ती आज सावंतवाडीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तलावाच्या काठावरील संरक्षण रेलिंगवर लावलेला हा दहीहंडीचा बॅनर अचानक वाऱ्याने फाटून खाली रस्त्यावर आला आणि थेट दुचाकीस्वाराच्या गाडीवर आदळला. गाडीचा ताबा सुटून दुचाकी घसरली, मात्र समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीचालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावला आणि मोठी दुर्घटना टळली.
सावंतवाडीकरांच्या म्हणण्यानुसार, ही ‘बॅनरराज’ची व्याधी नवीन नाही. यापूर्वी जागृत नागरिकांनी नगरपालिकेला जाब विचारल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी वैशाली पाटील यांनी सर्व बॅनर काढून टाकले होते. पण आता पुन्हा एकदा शहराच्या मुख्य ठिकाणी, तलावाच्या काठावर, रस्त्यालगत भलेमोठे बॅनर झळकू लागले आहेत.
*नागरिकांचा सवाल आहे* — “मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे… आणि या बॅनरबाजीमधून नेमके काय साध्य होते? एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”
आजचा अपघात हे फक्त इशारा आहे. उद्या याच बॅनरमुळे एखाद्याचा जीव गेला, तर त्याचे उत्तरदायित्व केवळ बॅनर लावणाऱ्यांवरच नाही, तर परवानगी देणाऱ्या प्रशासनावरही असेल — ही चर्चा सध्या सावंतवाडीत पेट घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!