*सांगलीतील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीला “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार*!
*सांगलीतील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीला “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार*!
*छोट्यांच्या दमदार कामगिरीमुळे जिल्ह्याचा झाला गौरव*
सावंतवाडी, दि. २२ जुलै (प्रतिनिधी): सांगली येथील केपीज बुद्धिबळ ॲकेडमीच्या वतीने आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत तब्बल सहा पारितोषिके पटकावली. त्यांच्या या घवघवीत यशामुळे “बेस्ट ॲकेडमी” हा बहुमान मुक्ताई ॲकेडमीला मिळाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार चारव्यांदा पटकावणारी मुक्ताई ॲकेडमी ही जिल्ह्यातील एकमेव ॲकेडमी ठरली आहे.
*स्पर्धेचा व्यापक सहभाग आणि दर्जा*
जागतिक बुद्धिबळ संघटना फिडेच्या १०१व्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुवर्य कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधून आणि पाच वेगवेगळ्या देशांतून आलेल्या सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नऊ वर्षांखालील, तेरा वर्षांखालील आणि खुल्या गटांमध्ये आठ राऊंड्स खेळविण्यात आले.
*उत्कृष्ट खेळ करणारे विद्यार्थी*
मुक्ताई ॲकेडमीच्या अकरा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यामध्ये तेरा वर्षांखालील गटात विराज दळवी आणि चिदानंद रेडकर यांनी प्रत्येकी सहा राऊंड्स जिंकत अनुक्रमे १८वा आणि २०वा क्रमांक मिळवला. अथर्व वेंगुर्लेकर याने पाच विजय व एक बरोबरी, लिएण्डर पिंटो व हर्ष राऊळ यांनी प्रत्येकी पाच विजय मिळवले. खुल्या गटात पार्थ गावकर याने चार विजय मिळवत १५ वर्षांखालील गटात ८वा क्रमांक पटकावला.
*उत्साही नवखे खेळाडूही लाजवाब*
स्पर्धेत स्वराज सावंत, प्रज्वल नार्वेकर, दक्ष वालावलकर या आठ वर्षांच्या नवख्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकी चार विजय मिळवले. साक्षी रामदुरकर हिने तीन विजय मिळवून चांगली कामगिरी केली.
*प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन*
या सर्व यशामागे मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. उत्कर्ष लोमटे सर यांचे कसून मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पालक व समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

