पंच्याहत्तरीतून ७६ त्तरी कडे वाटचाल करणारे तरुणाईला लाजवेल असे व्यक्तिमत्व दमदार द.म.गवस गुरुजी
*🛑 पंच्याहत्तरीतून ७६ त्तरी कडे वाटचाल करणारे तरुणाईला लाजवेल असे व्यक्तिमत्व दमदार द.म.गवस गुरुजी*
*🛑 शिस्तप्रिय शिक्षक, उत्कृष्ट कवी, कुशल क्रीडापटू , यशस्वी शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा लाडके मार्गदर्शक ; द. म. गवस गुरुजींच्या कार्यकर्तृत्वाचा प्रेरणादायी प्रवास*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-०३:-* “कांदा आणि भाकर खाऊ द्या कीर, मला बी जत्रेला येऊ द्या कीर” हे गाणं घेऊन शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये मुलांमध्ये रमबाण होणारे माझ्या पूर्ण प्राथमिक शाळा क्र.४ मधील त्यावेळचे दमदार शिक्षक द.म गवस गुरुजी अर्थात दत्ताराम महादेव गवस हे हाडाचे शिक्षक व शेतकरी.. शेतामध्ये राब राब राबून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.आई वडिलांचे पांग फेडणारा शेतकऱ्याचा मुलगा खऱ्या अर्थाने हाडाचा शिक्षक ,शेतकरी ,कवी,द.म. गवस गुरुजी.गवस गुरुजी हे माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक.मी इयत्ता पहिली पासून सातवीपर्यंत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये शिकलो त्यावेळी दत्ताराम गवस गुरुजी मुलांना लावत असलेली शिस्त मुलांच्या पाठीत पडणारे धपाटे व मुलांना गवस गुरुजीं विषयी असलेली आदर युक्त भिती,गवस गुरुजींचे लहान मुलां मध्ये लहान होऊन बागडणे यामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न तर असायचे व गवस गुरुजी हे हाडाचे शिक्षक असल्याने त्यांचे विद्यार्थी हे शिस्तप्रिय असायचेत..
आज गवस गुरुजींनी वयाची ७५ वर्ष पूर्ण करून ७६ त्तरी कडे वाटचाल करीत आहेत .मात्र आजही त्यांचं वागणं ,बोलणं, चालणं, कार्यकर्तृत्व ,हे तरुणाईला लाजवेल असेच आहे.दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावातील मूळचे रहिवासी असलेले दत्ताराम गवस गुरुजी यांचा पारंपारिक व्यवसाय हा शेती, त्यावेळी शिक्षण घेण्याकडे मुलांचा सहसा कल नव्हता अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील गवस गुरुजी यांनी आपले शिक्षण पूर्ण करून पुढे डीएड, बीएड करून नेमळे येथील प्राथमिक शाळेपासून आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली.
विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेल्या दस्ताराम गवस गुरुजींच्या हाताखालीच आम्ही घडलो ,त्यांचा मारही खाल्ला ,मात्र हा मार खात असताना गवस गुरुजींचा राग आम्हाला कधीच आला नाही, कारण तो मार आम्हाला चांगले वळण लागण्यासाठी व आमचे भवितव्य चांगले घडण्यासाठीच होता हे आम्ही त्यावेळी जाणले होते ,आताच्या पिढीमध्ये गवस गुरुजी मुलांना शिकवत असते तर मुलांच्या अनेक तक्रारी पालकांकडे गेल्या असत्या व पालक त्या तक्रारी घेऊन शाळेत आले असते,मात्र माझ्या काळात गवस गुरुजींचे धपाटे अनेकांनी खाल्ले मात्र कधीही विद्यार्थ्यांनी घरी तक्रार केली नाही किंवा घरी तक्रार झाल्यावर पालकांनी शाळेत येऊन त्याची कधी विचारणा केली नाही ,त्यामुळे अगदी वडीलकीच्या नात्याने शिक्षकही मुलांना तो शिकला पाहिजे , चांगला घडायला पाहिजे यासाठी शिस्त लावून शिकवत असत.
मुलांमध्ये मुलांसारखे रमबाण होऊन त्यांच्यामध्ये मिसळून त्यांना आपलेसे करून शिकवणारे गवस गुरुजी हे रसायन काहीतरी वेगळेच होते,कबड्डी ,खो- खो ,कवायतीचे सर्व प्रकार,लेझीम या मध्ये गवस गुरुजी पारंगत होते,तसेच ते उत्कृष्ट कविही आहेत. त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत,कोणाच्या पाठून फिरण्यात त्यांना स्वारस्य नसल्याने अनेक पुरस्कारां पासून ते वंचित राहिले,खर तर गवस गुरुजींचा आलेख पाहिल्यावर शासनाचे शिक्षकांसाठी असलेले अनेक पुरस्कार त्यांना मिळायला हवे होते मात्र ते मिळाले नाहीत म्हणून ते कधीच नाराज झाले नाहीत आपली सेवा तशीच सुरु ठेवली.
२६ जानेवारीच्या पोलीस परेड ग्राउंड व त्यासाठी होणारी अगोदरची रंगीत तालीम व कवायती .व या सर्वामध्ये शाळेचा येणारा पहिला नंबर याचे सर्व श्रेय हे दत्ताराम गवस गुरुजींनाच होते. त्यांची चार नंबर शाळेतून ज्यावेळी बदली झाली त्यावेळी चार नंबर शाळेच्या शिक्षक पालक संघाचा अध्यक्ष मी होतो ,सर्व पालकांनी माझ्या अध्यक्षतेखाली गवस गुरुजी यांना या शाळेतून सोडणार नाही असा उठाव करून शाळा बंद आंदोलन पुकारले व गवस गुरुजींना पुन्हा त्याच शाळेत नियुक्ती देण्यात आली एवढी गवस गुरुजींची लोकप्रियता होती. ते शाळेत असताना शाळेची पटसंख्याही चारशे च्या बाहेर होती.
शाळेला बंदिस्त संरक्षक कठडा असावा यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली गवस गुरुजी व आम्ही अनेक ठिकाणी दानशूर व्यक्तींकडे फिरून निधी गोळा केला व शाळेला संरक्षक कठडा बांधला अशी कितीतरी कामे गवस गुरुजींनी त्यावेळी पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार साठी केली, सावित्रीबाई दत्तक पालक योजना असो किंवा खेळाचे साहित्य असो त्यासाठी गवस गुरुजी सतत कार्यरत असायचे त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात विविध हुद्द्यावर काम करीत आहेत ,त्याचा सार्थ अभिमान गवस गुरुजींनाही वाटत असेल.
आज त्यांचा ७५ वा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी घेतलेला हा थोडक्यात आढावा, परमेश्वराने त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य देऊन त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण कराव्यात अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा गुरुजी..

